दिल्ली कॅपिटल्सचा 6 गड्यांनी विजय
गुजरात जायंट्स पराभूत, जोनासन ‘सामनावीर’, शिखा पांडेचे 2 बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
‘सामनावीर’ जेस जोनासनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग मधील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर 6 गड्यांनी विजय मिळवित गुणतक्त्यात 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरात जायंट्सने 20 षटकात 9 बाद 127 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 15.1 षटकात 4 बाद 131 धावा जमवित विजय नोंदविला. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 5 सामन्यातून 3 विजयासह 6 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले आहे. आरसीबी 4 गुणांसह दुसऱ्या तर युपी वॉरियर्स 4 गुणांसह तिसऱ्या आणि गुजरात जायंट्स 2 गुणांसह चौथ्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.
गुजरात जायंट्सच्या डावामध्ये भारती फुलमालीने 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 40, डॉटीनने 24 चेंडूत 5 चौकारांसह 26, तनुजा कंवरने 24 चेंडूत 1 चौकारांसह 16, मुनीने 11 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. गुजरात जायंट्सला 21 अवांतर धावा मिळाल्या. गुजरात जायंट्सच्या डावामध्ये 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. दिल्लीतर्फे शिखा पांडे, कॅप आणि सदरलँड यांनी प्रत्येकी 2 तर जोनासन व साधू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गुजरात संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 31 धावांत 4 गडी गमविले. त्यांचे अर्धशतक 54 चेंडूत, शतक 96 चेंडूत फलकावर लागले. कवंर आणि फुलमाली यांनी सातव्या गड्यासाठी 37 चेंडूत अर्धशतकी भागिदारी नोंदविली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावात सलामीची कर्णधार मेग लॅनिंग चौथ्या षटकातच काश्वी गौतमच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. तिने 3 धावा जमविल्या. शेफाली वर्मा आणि जोनासन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 37 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. गार्डनरने शेफाली वर्माला पायचित केले. तिने 27 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 44 धावा जमविल्या. कंवरने जेमीमा रॉड्रिग्सला केवळ 5 धावांवर तर गौतमने सदरलँडला एका धावेवर झेलबाद केले. दिल्लीची यावेळी स्थिती 13.1 षटकात 4 बाद 115 अशी होती. त्यांना विजयासाठी आणखी 13 धावांची जरुरी होती. जोनासन आणि कॅप यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दिल्लीने हा सामना 29 चेंडू बाकी ठेवून जिंकला. जोनासनने 32 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 61 तर कॅपने 8 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 9 धावा केल्या. गुजराततर्फे गौतमने 2 तर कंवर आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्लीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. दिल्लीचे अर्धशतक 40 चेंडूत तर शतक 67 चेंडूत फलकावर लागले. शेफाली आणि जोनासन यांनी 26 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. जोनासनने 26 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकात 9 बाद 127 (फुलमाली नाबाद 40, डॉटीन 26, कंवर 16, मुनी 10, अवांतर 21, पांडे, कॅप, सदरलँड प्रत्येकी 2 बळी, साधू आणि जोनासन प्रत्येकी 1 बळी), दिल्ली कॅपिटल्स 15.1 षटकात 4 बाद 131 (जोनासन नाबाद 61, शेफाली वर्मा 44, लॅनिंग 3, रॉड्रिग्स 5, सदरलँड 1, कॅप नाबाद 9, अवांतर 8, गौतम 2-26, गार्डनर आणि कंवर प्रत्येकी 1 बळी),