दिल्ली कॅपिटल्स महिलांचा रोमांचक विजय
यूपीवर 7 गड्यांनी मात, लॅनिंगचे अर्धशतक, अष्टपैलू सदरलँड सामनावीरची मानकरी
वृत्तसंस्था/ बडोदा
महिला प्रिमियर लीगमधील सामन्यात कर्णधार मेग लॅनिंगचे अर्धशतक, अॅनाबेल सदरलँड व मेरिझेन कॅप यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने यूपी वॉरियर्स महिला संघाचा 7 गड्यांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुणतक्त्यात दिल्ली 3 सामन्यात 4 गुण मिळवित दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीचेही 4 गुण झाले असून ते पहिल्या स्थानावर आहेत. यूपी वॉरियर्सने दोन्ही सामने गमविल्याने ते शेवटच्या स्थानावर आहेत. अष्टपैलू चमक दाखवलेल्या सदरलँडला सामनावीराचा बहुमान मिळाला.
दिल्लीकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर यूपी वॉरियर्सने 20 षटकांत 7 बाद 166 धावा जमविल्या. किरण नवगिरेने 27 चेंडूत 51 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 19.5 षटकांत 3 बाद 167 धावा जमवित रोमांचक विजय मिळविला.
यूपी वॉरियर्सच्या नवगिरे व दिनेश वृंदा (15 चेंडूत 16) यांनी आक्रमक सुरुवात करून देताना 5.5 षटकांतच 66 धावा फटकावल्या होत्या. पण नंतर त्यांचे शेवटचे पाच गडी केवळ 52 धावांची भर घालून बाद झाले. श्वेता सेहरावत (33 चेंडूत 37) व ग्रेस हॅरिस (12) यांनी पाचव्या गड्यासाठी 36 धावांची भर घातली. हॅरिसला अरुंधती रे•ाrने बाद करून ही जोडी फोडली. शेवटच्या टप्प्यात पहिलाच सामना खेळणाऱ्या चिनेली हेन्रीने जबरदस्त फटकेबाजी करून केवळ 15 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्याने यूपीला 160 धावांचा टप्पा पार करता आला. दिल्लीच्या अॅनाबेल सदरलँडने 26 धावांत 2 बळी मिळविले.
या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्मा व मेग लॅनिंग यांनी 6.5 षटकांतच 65 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. शफाली 16 चेंडूत 26 धावा काढून बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सही शून्यावर बाद झाली. लॅनिंगने अॅनाबेल सदरलँडसमवेत 49 धावांची भागीदारी केली. लॅनिंगला हॅरिसने त्रिफळाचीत करीत तिची खेळी संपुष्टात आणली. तिने 49 चेंडूत 12 चौकारांसह 69 धावा फटकावल्या. सदरलँडला नंतर मेरिझेन कॅपकडून चांगली साथ मिळाली. आवश्यक धावांचे आव्हान जास्त असल्याने या दोघींनी आक्रमक टोलेबाजी केली आणि चौथ्या गड्यासाठी 31 चेंडूत 48 धावांची अभेद्य भागीदारी करीत एक चेंडू बाकी ठेवून विजय साकार केला. सदरलँड 35 चेंडूत 41 तर कॅप 17 चेंडूत 29 धावांवर नाबाद राहिली. दिल्लीला यूपी वॉरियर्सच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचाही लाभ झाला.
संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स महिला 20 षटकांत 7 बाद 166 : किरण नवगिरे 27 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 51, वृंदा 15 चेंडूत 16, दीप्ती 7, मॅकग्रा 1, श्वेता सेहरावत 33 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 37, हॅरिस 14 चेंडूत 12, चिनेली हेन्री 15 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 33, अवांतर 7. सदरलँड 2-26, कॅप 1-30, जोनासन 1-21, अरुंधती रे•ाr 1-26, मिन्नू मणी 1-16.
दिल्ली कॅपिटल्स महिला 19.5 षटकांत 3 बाद 167 : शफाली वर्मा 16 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 26, लॅनिंग 49 चेंडूत 12 चौकारांसह 69, सदरलँड 35 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 41, कॅप 17 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 29. सोफी इक्लेस्टोन 1-31, दीप्ती शर्मा 1-27, ग्रेस हॅरिस 1-11.