For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅपिटल्सची आज आक्रमक सनरायझर्सविरुद्ध कसोटी

06:55 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्सची आज आक्रमक सनरायझर्सविरुद्ध कसोटी
Advertisement

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयपीएलमधील आज शनिवारी होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सची सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कसोटी लागणार आहे. या लढतीत दिल्लीच्या दृष्टीने रिषभ पंतची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. गेल्या वर्षी फिरोजशाह कोटला येथे पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या रिषभ दिसला असता तो कुबड्या घेऊन चालत होता. परंतु जेव्हा आज तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून त्या मैदानावर उतरेल तेव्हा सनरायझर्स हैदराबादला रोखण्यासाठी त्याला चाकोरीबाहेरचा विचार करावा लागेल.

Advertisement

कॅपिटल्ससाठी आतापर्यंतचा हंगाम संमिश्र राहिला आहे. परंतु लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सविऊद्धच्या दोन प्रभावी विजयांनी त्यांना परत शर्यतीत आणले आहे. आतापर्यंत सात सामन्यांमध्ये तीन विजय आणि चार पराभव त्यांनी नोंदविले आहेत. ‘आयपीएल’ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादने 3 बाद 277 आणि 3 बाद 287 या दोन सर्वोच्च धावसंख्यांसह एक वेगळी उंची गाठलेली आहे आणि त्यांचा सामना करण्यासाठी खूप कौशल्य आवश्यक आहे.

त्यामुळे कॅप्टन पंतला त्याच्या संसाधनांचा वापर अत्यंत सावधगिरीने कोटलाच्या खेळपट्टीवर करावा लागेल. ट्रॅव्हिस हेड (235 धावा) 39 चेंडूंतील शतकानंतर ती गती कायम ठेवण्यास उत्सुक असेल आणि त्याचा सहकारी अभिषेक शर्मा (211 धावा) हा देखील पॉवरप्लेच्या वेळी फटकेबाजी करण्यात मागे नाही. हेड आणि अभिषेकचा अनुक्रमे 199 आणि 197 हा स्ट्राइक रेट इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार या वेगवान त्रिकुटापुढे गंभीर आव्हान उभे करेल. हेन्रिक क्लासेनने देखील 199 धावा केल्या आहेत. तो एक सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे. त्यामुळे सनरायझर्सची फलंदाजी ही प्रतिस्पर्ध्यांना भीती वाटावी अशी आहे.

पण कुलदीप यादवची डावखुरी फिरकी खेळ बदलून टाकू शकते आणि ट्रिस्टन स्टब्सच्या रूपाने पंतला अक्षर पटेलसोबत वापरण्यासाठी फिरकीचा तिसरा पर्याय मिळाला आहे. पण स्वत: सलामीला येणाऱ्या पंतच्या दृष्टीने डेव्हिड वॉर्नरच्या पायाची दुखापत हे चिंतेचे कारण असेल. दुसरीकडे, जेक फ्रेझर-मॅकगर्कने त्याच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रभावित केले असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सनरायझर्सची फलंदाजी अव्वल राहिली असली, तरी कर्णधार पॅट कमिन्स वगळता गोलंदाजी तितकी प्रभावी राहिलेली नाही. जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार ही अनुभवी जोडी सुमार राहिली आहे, तर फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद हे खूप महाग ठरले आहेत.

संघ दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धूल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्र, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, रिचर्डसन, रसिख दार सलाम, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेन्रिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंह यादवहृ उमरान मलिक, नितीशकुमार रे•ाr, फजलहक फाऊकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.