गुजरात जायंट्सला नमवून दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीत
सामनावीर शेफालीचे दणकेबाज अर्धशतक, मिन्नू, कॅप, शिखाचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेफाली वर्माचे धडाकेबाज अर्धशतक आणि मिन्नू मणी, मेरिझन कॅप, शिखा पांडे यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 7 गड्यांनी धुव्वा उडवित महिला प्रिमियर लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. 37 चेंडूत 71 धावा फटकावणाऱ्या शेफाली वर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला.
गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या दिल्लीने थेट अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने प्रयत्न केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात जायंट्सला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 126 धावांवर रोखले. त्यानंतर दिल्लीने 13.1 षटकांत 3 बाद 129 धावा जमवित आरामात विजय साकार केला. 71 धावांची खेळी करणारी शेफाली वर्मा 3 धावांची गरज असताना बाद झाली. तिने आपल्या खेळीत 7 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी केली. मेग लॅनिंगसमवेत 31 धावांची सलामी दिल्यानंतर शेफालीने जेमिमा रॉड्रिग्जसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली. तिने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा 28 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार मारत 38 धावांवर नाबाद राहिली. त्याआधी लॅनिंग 18 व कॅप्से शून्यावर बाद झाली होती.
फुलमाली व ब्राईस यांची अर्धशतकी भागीदारी
तत्पूर्वी, दिल्लीच्या शिस्तबद्ध व अचूक माऱ्यापुढे प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या गुजरातला 9 बाद 126 धावांपर्यंत मजल मारता आली. चौथ्या षटकांतच त्यांची 2 बाद 12 अशी स्थिती झाली होती. कर्णधार बेथ मुनी शून्यावर बाद झाली. नंतर जोनासनने दयालन हेमलताला बाद केले. फीबी लीचफिल्ड (21) व अॅश्ले गार्डनर (12) यांनाही मोठे योगदान देता आले नाही. दोघींनी चौथ्या गड्यासाठी 23 धावांची भर घातली. वुलव्हार्टही 7 धावा काढून बाद झाल्यानंतर त्यांची स्थिती 3 बाद 16 अशी झाली. 11 व्या षटकांत गुजरातने 5 बाद 48 धावा केल्या होत्या. भारती फुलमाली (36 चेंडूत 42) व कॅथरीन ब्राईस (22 चेंडूत नाबाद 28) यांनी सहाव्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केल्यामुळेच त्यांना इथवर मजल मारता आली, अन्यथा याहून कमी धावांत गुजरातचा डाव आटोपला असता. दिल्लीच्या मेरिझन कॅपने पॉवरप्लेमध्ये अप्रतिम मारा करीत 17 धावांत 2 बळी टिपले. तिला मिन्नू मणी व शिखा पांडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत उत्तम साथ दिली.
शुक्रवारी मुंबई इंडियन्स व आरसीबी यांच्यात एलिमिनेटर लढत होईल. यातील विजयी संघाशी रविवारी दिल्ली कॅपिटल्सची जेतेपदाची लढत होईल. मागील वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले होते.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स महिला 20 षटकांत 9 बाद 126 : लिचफील्ड 22 चेंडूत 21, गार्डनर 12 चेंडूत 12, भारती फुलमाली 36 चेंडूत 7 चौकारांसह 42, ब्राईस 22 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 28, अवांतर 7, मिन्नू मणी 2-9, कॅप 2-17, शिखा पांडे 2-23, जोनासेन 1-32.
दिल्ली कॅपिटल्स महिला 13.1 षटकांत 3 बाद 129 : लॅनिंग 10 चेंडूत 18, शेफाली वर्मा 37 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह 71, जेमिमा रॉड्रिग्ज 28 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 38, अवांतर 2, तनुजा कंवर 2-20.