दिल्ली मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी
आतिशींच्या मंत्रिमंडळात मुकेश अहलावत नवा चेहरा : गोपाल राय-सौरभ भारद्वाजसह चार जुने चेहरे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या आतिशी मार्लेना उद्या, शनिवार 21 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आतिशी आपल्या मंत्रिमंडळासोबत शपथ घेणार आहेत. मुकेश अहलावत हे मंत्रिमंडळात नवा चेहरा असतील. मुकेश हे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार आनंद यांची जागा घेतील, असे पक्षाच्यावतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. अहलावत हे दिल्लीतील सुलतानपूर माजरा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात सदस्य आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 पर्यंत असल्यामुळे नवीन मुख्यमंत्री आणि नवीन सदस्यांना अल्प कार्यकाळ मिळणार आहे.
गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन हे मंत्रिमंडळात मंत्री राहतील. सातव्या सदस्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. त्याच दिवशी केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता.
आतिशी मार्लेना यांच्याकडे सध्या वित्त, महसूल, पीडब्ल्यूडी आणि शिक्षण यासह 13 प्रमुख विभाग आहेत. गोपाल राय हे पर्यावरण, विकास आणि सामान्य प्रशासन प्रभारी आहेत. सौरभ भारद्वाज यांच्याकडे इतर विभागांसह आरोग्य, पर्यटन आणि नगरविकास खात्यांची जबाबदारी आहे. गेहलोत यांच्याकडे वाहतूक, गृह आणि महिला आणि बालविकास खाती आहेत, तर इम्रान हुसेन अन्न आणि पुरवठा मंत्री आहेत. समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर दिल्लीच्या सुलतानपूर माजरा येथील आमदार अहलावत यांचा समावेश करण्यात आला आहे. आनंद यांनी एप्रिलमध्ये केजरीवाल सरकारला रामराम ठोकत पक्षत्याग केला होता.
आतिशी मार्च 2023 मध्ये दिल्ली मंत्रिमंडळात
आतिशी ह्या 2013 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या पक्षाच्या जाहीरनामा मसुदा समितीच्या सदस्य होत्या. त्या पक्षाच्या प्रवक्त्याही राहिल्या आहेत. त्या दिल्ली विधानसभेत कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून दिल्ली सरकारमधील महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मद्य धोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांच्या अटकेनंतर ‘आप’ला आलेल्या अडचणींमध्ये मार्च 2023 मध्ये आतिशी यांची दिल्ली मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली होती. दिल्लीत आम आदमी पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आतिशी यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आतिशी यांनी पुढच्या निवडणुकीपर्यंत आपल्याकडे दिल्लीतील जनतेला भाजपच्या कारस्थानापासून वाचविणे आणि केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे अशी महत्त्वाची कामे असल्याचे वक्तव्य केले होते.