शालेय विद्यार्थ्यांना बूट मिळण्यात दिरंगाई
मंजूर रक्कम जमा नसल्याने विलंब : तोकड्या अनुदानामुळे शाळांकडून पदरमोड
बेळगाव : शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन तीन आठवडे झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांना नवीन बूट मिळालेले नाहीत. राज्य सरकारने अनुदान मंजूर केले असले तरी अद्याप ते शाळा सुधारणा कमिटी व मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे नवीन बूट मिळण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.2024-25 या शैक्षणिक वर्षात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना बूट व मोजे खरेदीसाठी 12.60 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शाळांमधील एसडीएमसी कमिटी व मुख्याध्यापक यांनी तीन पुरवठादारांकडून किमती मागवून त्यानंतर बूट खरेदी करावयाची आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पहिली ते दहावीमध्ये 1 लाख 96 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 2 लाख 52 हजार 742 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी बूट उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने मागील वर्षीचेच बूट घालून विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत.प्रत्येक वर्गानुसार बुटांची किंमत शाळेच्या संयुक्त खात्यावर जमा केली जाते. परंतु, 2017-18 पासून निर्धारित केलेली एकच रक्कम आजही दिली जाते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे बूट खरेदी करताना शिक्षक व एसडीएमसी कमिटीला तारेवरची कसरत करावी लागते. येत्या आठवडाभरात बुटांचे अनुदान खात्यांवर जमा होण्याची शक्यता असली तरी बूट खरेदी करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.