For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मासिक रेशन वितरण लांबणीवर

11:30 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मासिक रेशन वितरण लांबणीवर
Advertisement

लाभार्थी-रेशनदुकानदारांमध्ये बाचाबाची, खात्याचे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : मागील काही महिन्यांपासून रेशन वितरण लांबणीवर पडू लागले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरमहा 1 ते 3 तारखेपर्यंत वितरित करण्यात येणारे रेशन 10 तारीख उजाडली तरी अद्याप वितरित झालेले नाही. त्यामुळे लाभार्थी रेशनदुकानाकडे हेलपाटे मारू लागले आहेत. मात्र, अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनदुकानदारांनाही याबाबत कल्पना दिलेली नाही. त्यामुळे लाभार्थी आणि रेशनदुकानदारांमध्ये बाचाबाची होऊ लागली आहे.

बेंगळूर येथे रेशन वितरणासंबंधी स्वतंत्र सर्व्हर युनिट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे रेशन वितरणात व्यत्यय येत आहे. शिवाय तांत्रिक अडचणींमुळे मासिक रेशन वितरण लांबणीवर पडू लागले आहे, अशी माहितीही अन्न व नागरीपुरवठा खात्याने दिली आहे. मात्र, याबाबत रेशनदुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये पुरेशी माहिती नसल्याने गोंधळ उडू लागला आहे.

Advertisement

शहर आणि ग्रामीण भागातही रेशन वितरण विस्कळीत झाले आहे. दरमहा 1 ते 5 तारखेपर्यंत मिळणारे रेशन वेळेत मिळत नसल्याने गोरगरीब लाभार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून माणसी पाच किलो रेशनचा पुरवठा केला जातो. मात्र, ते वेळेवर दिले जात नसल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याची 10 तारीख उलटली तरी अद्याप रेशनचे वितरण होऊ शकले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना केवळ प्रतीक्षा लागली आहे.

15 ऑक्टोबरनंतर रेशन वितरणाला प्रारंभ होईल

अन्न व नागरीपुरवठा खात्याने रेशन वितरणाला उशीर का होत आहे? याबाबत खुलासा केलेला नाही. त्यामुळे रेशनदुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये बाचाबाची होत आहे. 15 ऑक्टोबरनंतर रेशन वितरणाला प्रारंभ होईल. लाभार्थ्यांनी गैरसमज करून घेऊ नये. शिवाय अन्न व नागरीपुरवठा खात्यानेही उशिराने रेशन वितरणाबाबत आदेश जारी करावा.

- राजशेखर तळवार ,(राज्य उपाध्यक्ष सरकारी रेशनदुकानदार मालक संघटना)

Advertisement
Tags :

.