Wari Pandharichi 2025: देहू, आळंदीत लगबग, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान
आळंदी, देहूत वारकऱ्यांची गर्दी, संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग
पिंपरी : जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची लगबग देहू आणि आळंदीमध्ये सुरू झाली आहे. 18 आणि 19 जून रोजी पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. देहूवरून संत तुकाराम महाराजाची पालखी 18 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल, तर 19 जून रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. आळंदी, देहूत वारकऱ्यांची गर्दी झाली असून संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग पहायला मिळत आह
धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव । तेथे नांदे देव । पांडुरंग ।।
अशा शब्दांत ज्या देहूचे माहात्म्य वर्णिले जाते, ती देहूनगरीत वैष्णवांच्या आगमनाने गजबजून गेली आहे. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी दुपारी अडीच वाजता प्रस्थान ठेवणार असून, या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो पावले इंद्रायणी काठी विसावली आहेत.
पालखी प्रस्थान सोहळा हा वारीचा आरंभबिंदू. देहूतून आधी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होते. देहूतील प्रस्थानाची संपूर्ण तयारी झाली असून, इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून झुंबड पहायला मिळत आहे. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायतीकडून प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हजारो वारकरी, भाविक देहूत दाखल झालेत. यासंदर्भात पालखी सोहळ्याचे प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे म्हणाले, यंदाचा हा 340 वा पालखी सोहळा असून, संस्थानच्या वतीने सर्व तयारी केली आहे.
चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले आहे. सोहळ्यात 500 च्या आसपास दिंड्या असून, देहूत सर्व दिंड्या दाखल झाल्यात. देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. प्रस्थान सोहळा बुधवारी दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाड्यातील
भजनी मंडपातून सुरू होईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती असेल.
आळंदी, पुणे, प्रतिनिधी
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचारविचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आळंदी. येत्या गुऊवारी 19 जूनला माउलींच्या पालखीचे येथून प्रस्थान होत असून, अलंकापुरीच्या दिशेने वारकऱ्यांच्या पावले पडू लागली आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारो वारकरी आळंदीनगरीत दाखल झाले असून, आळंदीतील वातावरण मोहरून गेले आहे.
आषाढीची वारी । आहे माझे घरी । आणिक न करी । तीर्थव्रत ।।
हा भाव बाळगत लाखो वारकरी आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होत असतात. देहूतून तुकोबांची, आळंदीतून ज्ञानोबांची, तर अन्य विविध ठिकाणांहून अन्य संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघतात. येत्या गुरुवारी माउलींच्या पालखीचे प्रस्थान होत असून, आतापासून अलंकापुरीत वैष्णवांनी दाटी केल्याचे दिसत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे वारकरी आळंदीतील मठ, धर्मशाळा, सभागृह, शाळांसह विविध ठिकाणी उतरलेत. मानाच्या दिंड्यांचेही आगमन झाल्याचे पहायला मिळत आहे. कपाळी गंध, खांद्यावर भगवा ध्वज, हाती टाळ मृदंग आणि मुखी ज्ञानोबा-तुकोबा नामाचा गजर करीत या वारकऱ्यांनी आळंदीतील वातावरण भारून टाकले आहे.
माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या 19 जून रोजी रात्री 8 वाजता आळंदी येथून होणार आहे. यंदा माऊलींचे 750 वे जन्मोत्सव वर्ष असल्याने या सोहळ्याला लाखेंच्या संख्येने वारकरी आणि भाविक येण्याची शक्यता आहे.
500 दिंड्यांना आरोग्य किट
नगरपंचायत, आरोग्य विभागाकडून 500 दिंड्यांना आरोग्य किटचे वाटप होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देहू ते देहूरोड पालखी मार्गाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. इंद्रायणी नदीच्या घाटावर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. गाव परिसरात सुमारे 1200 फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मानाच्या 10 पालख्या
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर)
- संत चांगावटेश्वर महाराज (सासवड)
- संत सोपानदेव महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर, जळगाव)
- रुक्मिणी माता (कौंडिण्यपूर, अमरावती)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर)
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच रुपरेषा
► बुधवारी 18 जून रोजी पालखी प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात
► पहाटे साडेचार वाजता देऊळवाड्यात काकड आरती
► पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्या वतीने महापूजा
► पहाटे साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
► सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान येथील तुकोबाराय मंदिरात महापूजा
► सकाळी सहा वाजता सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा
► सकाळी आठ ते नऊ यावेळेत गाथा भजनाची सांगता
► सकाळी 10 ते 12 या वेळेत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन
► दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम
► इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दुपारी 2 वाजता मुख्य देऊळवाड्यात आगमन
► पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात
► पालखीची सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा
► सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदार वाड्यात मुक्कामी
आषाढी वारी मार्ग 2025
By : चैतन्य उत्पात, पंढरपूर
पंढरीतील नागरिकांसाठी आषाढी वारी म्हणजे आर्थिक नफ्याची सुगी. राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो श्री विठ्ठल भक्त चातक पक्षाच्या आतुरतेने वर्षातील सर्वात मोठी असलेल्या आषाढी वारीची वाट पाहत असतो. याचप्रमाणे पंढरपूरचे स्थानिक देखील आषाढी वारीची वाट पाहत असतात, कारण वारी झाल्यावरच पंढरीचे जनजीवन स्थिर होते.
वारी काळात हजारो दुकानदार कोणी हात उसने तर कोणी चक्क व्याजाने पैसे घेऊन वारीत दुकाने थाटतात, वारीत उत्तम व्यवसाय करून घरखर्च भागवतात, तर अगदी पश्चिमद्वार, नदी वाळवंटात हजारो भाविकांना दररोज गंध लावून दहा, बारा वर्षाची मुलेही चांगली कमाई करतात, घरोघरी वारीकाळात वारकरी वास्तव्यास असतात.
ही मंडळी खासकरून विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील असतात. जाताना मोठी रक्कम व उरलेला शिधा देखील घरमालकांना देऊन जातात. त्यामुळे वारी झाली की अनेकांच्या खिशात पैसे खुळखुळतात. खऱ्या अर्थाने गावातील शाळा या आषाढी वारी झाल्यावरच सुरू होतात.