Satara ZP News : अन्यथा फौजदारी कारवाई करा.., भर सभागृहात साताऱ्याच्या CEO का भडकल्या?,
सरळ शासनाची फसवणूक करता का, फौजदारी कारवाई करा
सातारा : ग्रामसेवकांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन उपस्थित होत्या. बदली प्रक्रियेवेळी प्रशासकीय बदलीमध्ये एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये दिव्यांगाचे युआयडीच नसल्याची बाब निदर्शनास येताच श्रीमती नागराजन या भडकल्या.
त्यांनी सरळ शासनाची फसवणूक करता का, फौजदारी कारवाई करा, अशा शब्दात त्यांनी चांगला जाळ काढला. दरम्यान, मंगळवारी विनंती बदल्यांवेळी खेड ग्रामपंचायतीसाठी कोणताही जिल्ह्यातील ग्रामसेवक यायला तयार नाही तर संभाजीनगरसाठी मात्र अनेकांच्या उड्या होत्या. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच बदल्यांच्या प्रक्रियेवेळी शासकीय कर्मचारी कशी बोगसगिरी करत आहेत.
यावरुन चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे. असे असताना जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया कुठेही विनाकारण वादग्रस्त ठरु नये, यासाठी स्वतः श्रीमती याशनी नागराजन यांनी लक्ष घातले आहे. त्या पहिल्या दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या प्रक्रियेमध्ये उपस्थित राहून खाते प्रमुखांच्याकडून प्रक्रिया पार पाडत आहेत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेवेळी दिव्यांग प्रवर्गातून एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे युआयडी कार्डची मागणी केली.
तेव्हा त्यांनी कार्डबाबत समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यांनी चौकशी केली असता युआयडी कार्ड काढले गेले परंतु ते रिजेक्ट झाले असल्याचे तेथेच ऑ नलाईन निदर्शनास येताच नागराजन या चांगल्याच भडकल्या. २०२४ मध्ये युआयडी रिजेक्ट झाले आहे, त्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला दिली नाही. उलट बदली प्रक्रियेचा लाभ घेत आहात.
त्यामुळे तुम्ही भरती त्याच प्रवर्गातून झाला आहात काय? याचीही चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा स्वरुपाच्या सूचना देताच उपस्थित असलेले इतर ग्रामपंचायत अधिकारी व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुळबुळ वाढली. त्यांनी लगेच सीईओ याशनी नागराजन यांना विनंती केली. त्यानंतर मात्र 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' असा प्रकार झाल्याची चर्चा सुरु आहे.
खेडला ग्रामपंचायतीला जायलाच कोणी तयार नाही
सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायत तशी राजकीय संबेदनशील मानली जाते. या गावात काम करणारा ग्रामपंचायत अधिकारी तेवढाच मुरब्बी असा असायला हवा. दोन्ही बाजूचा राजकीय दबावाने या गावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कोंडी होत असते.
त्यामुळे या गावात जायला जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नकार घंटा आहे. परंतु शेजारच्या संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये जाण्यासाठी अनेकांच्या उड्या पडत होत्या. तेथेही एका आमदारांच्या गटाने ग्रामपंचायत अधिकारी हाच मिळावा, म्हणून पत्रही दिल्याचे समजते.