कोलवाळ ‘लाला की बस्ती’ची झाडाझडती
कोलवाळ पोलिसांची दिवसभर धडक कारवाई : बेकायदेशीरपणे राहतात 96 जण बिगरगोमंतकीय,घरमालकांकडे, भाडेकरुंकडेही नाही कागदपत्रे
म्हापसा : राज्यात सध्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे पोलीस व सरकार ‘टार्गेट’ होत आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या, फ्लॅट फोडणे, कार चोरणे, तसेच मंदिरांमध्येही चोऱ्या वाढल्या आहेत. मोठ्या चोऱ्यांसह भुरट्या चोऱ्याही वाढलेल्या आहेत. या सर्व प्रकारांची दखल घेत कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या पुढाकाराने काल गुऊवारी दिवसभर कोलवाळ येथील ‘लाला की बस्ती’मध्ये राहणाऱ्या परप्रांतीय लोकांची झाडाझडती घेण्यात आली. तब्बल 96 बिगर गोमंतकीयांची झडती घेण्यात आल्यानंतर ते बेकायदेशीरपणे राहत असल्याचे उघड झाले आहे. गोठणीचा व्हाळ येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहत असून त्यात काही बंगलादेशीय नागरिकांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. कोलवाळ पोलिसांनी या परप्रांतीयाविऊद्ध केलेल्या कारवाईचे स्वागत आहेच, त्याचप्रमाणे गोठणीचा व्हाळ येथे राहणाऱ्या परप्रांतीयांचीही झडती घ्यावी, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. गुऊवारी सकाळच्या सत्रात करण्यात आलेल्या या धडक कारवाईत स्पष्ट झाले की तब्बल 96 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. एखाद्या घर मालकाने भाडेकरू ठेवल्यास त्याची अधिकृत कागदपत्रे पोलीस स्थानकात जमा करायला हवीत. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने कोलवाळ पोलिसांनी ही कारवाई केली.
लाला की बस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बिगरगोमंतकीय बेकायदेशीरपणे राहत असतात, असा संशय होता तो या कारवाईत उघड झाला आहे. एखाद्या गुन्ह्याबाबत कुणाला पकडण्यासाठी तेथे गेल्यास पोलीस येण्याअगोदरच ते तेथून पळ काढतात. परिणामी पोलिसांना तपासात अडथळा निर्माण होतो. थिवी मतदारसंघातील एका बलाढ्या राजकारण्याची आलिशान कार चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले असून त्यामुळे ‘लाला की बस्ती’मध्ये ही धडक कारवाई करण्यात आली.
स्थानिक पंचायतीची लालाला नोटीस
लाला की बस्ती पूर्णत: बेकायदेशीर असून आपल्या वोट बँकसाठी काही राजकारणी तिला अभय देतात. ती जमिनदोस्त करावी अशी मागणी अनेकदा कोलवाळच्या लोकांनी केली आहे. शिवाय ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’नेही याविरोधात आवाज उठविला होता, मात्र या वस्तीतील घरमालकाने या विरोधात न्यायालयात धाव घेऊन ही वस्ती वाचविण्यात यश मिळविले. मात्र त्याची प्रक्रिया अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. विशेष म्हणजे या वस्तीकडे जाण्यास स्थानिक लोकही घाबरतात. स्थानिक कोलवाळ पंचायतीनेही या वस्तीच्या मालकास ती बेकायदेशीर असल्याची नोटीस बजावली होती, पण अजूनही कारवाई झालेली नाही.
कोलवाळ पोलिसांची धडक कारवाई
कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रकाश घाडी, रामचंद्र साटेलकर, सनी काणेकर, हवालदार अनिल पिळगावकर, पांडुरंग नाईक, संदीप मळिक, रामेश्वर गांवस, शिपाई सर्वेश कळंगुटकर, राजेश गांवस, प्रसाद नाईक, झिको वाज, साईनाथ धुरी, ऋषिकेश कामत, प्रवीण पाटील, निखिल नाईक, समीर नाईक, अंकिता गडेकर, शामल च्यारी, रितेश गांवस, लक्ष्मीकांत कवठणकर, अन्वी सावंत यांनी ही कारवाई करीत सुमारे 96 जणांची झडती केली.
गृहखात्याच्या आदेशावरून कारवाई
आजच्या या कारवाईसंदर्भात स्थानिक आमदार तथा मच्छीमारीमंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की लाला की बस्तीवर झालेल्या पोलीस कारवाईचे आपण स्वागत करतो. हा सरकारचा निर्णय आहे. गृहखात्याच्या आदेशावरून ही कारवाई झालेली आहे. राज्यात जेव्हा चोऱ्या होतात तेव्हा पोलिसांना कारवाईसाठी झडती घ्यावीच लागते, असेही मंत्री म्हणाले.
- नीळकंठ हळर्णकर
घरमालकांना नोटीस बजावणार
कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे म्हणाले की या बस्तीमध्ये परप्रांतीयांचा भरणा वाढला आहे. आम्ही त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली. आता 96 जणांवर कारवाई अटळ आहे. त्यांच्या गावातील पोलीस स्थानकांकडून कागदपत्रे मागून घेण्यात येतील. घरमालक भाडेकरुंची काहीच माहिती पुरवित नसल्याने आता घरमालकांवरही गुन्हे नोंदविले जाणार आहेत, असेही राणे म्हणाले.
- पोलीस निरीक्षक विजय राणे
‘लाला की बस्ती’ जमीनदोस्त करा
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख तुकाराम (मनोज) परब म्हणाले की, लाला की बस्तीमध्ये यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केलेली आहे. बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेतात, मात्र त्यांचा मालक येऊन त्यांना सोडून नेतो. वेगवेगळ्या राज्यात तडीपार झालेले गुन्हेगार या वस्तीत असतात. टेनंट व्हेरीफिकेशन कायदा व्हायलाच हवा. त्यांच्या नातेवाईकांचा अहवाल मागणारा कायदा हवा आहे. सरकारने अशा बेकायदेशीर वस्त्या जमिनदोस्त करायला पाहिजेत, सरकार हे धाडसी पाऊल का उचलत नाही, असा सवालही परब यांनी केला आहे.
- मनोज परब
बिगरगोमंतकीयांना रोखायला हवे
शिरसई येथील समाजसेवक अमन लोटलीकर म्हणाले की, दोन दिवसापूर्वीच आपल्या पत्नीची कार सर्विसींगसाठी दिली असता रात्री 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ती चोरून नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद झाले आहे. याबाबत आपण कोलवाळ पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. कॅमेरे असूनही चोऱ्या वाढू लागल्या आहेत. राज्यात वाढत असलेल्या परप्रांतीयांवर पोलिसांनी कडक नजर ठेवावी. अन्यथा गोवा बिहार होण्यास वेळ लागणार नाही.
- अमन लोटलीकर
कोलवाळवासियांसाठी धोक्याची घंटा
कोलवाळचे पंच सदस्य रितेश वारखंडकर म्हणाले की, लाला की बस्ती ही कोलवाळवासियांसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे. स्थानिक नागरिक, महिलावर्गसाठी धोका आहे. चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत आहे. अशा बेकायदेशीररित्या कागदपत्राची पडताळणी न करता भाडेपट्टीवर ठेवणाऱ्या घरमालकांवरही कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी मागणी वारखंडकर यांनी केली.
- रितेश वारखंडकर