For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्य विचलित, पदकापासून वंचित

06:46 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्य विचलित  पदकापासून वंचित
Advertisement

जखमी असूनही प्रतिस्पर्ध्याला झुंजवले : पदकाविना बॅडमिंटनमधील भारताचे आव्हान संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत जबरदस्त खेळानंतरही त्याला पराभव स्वीकाराव लागला. सेमीफायनलमधील पराभवानंतर लक्ष्य कांस्यपदक जिंकेल असे वाटत होते, पण सोमवारी झालेल्या लढतीत 1-0 अशा आघाडीनंतरही त्याला हार मानावी लागली. उजव्या हाताला दुखापत झालेली असतानाही 22 वर्षीय लक्ष्यने मलेशियन ली झियाला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मलेशियाच्या ली झियाने 13-21, 21-16 आणि 21-11 असा विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये एकही पदक मिळालेले नाही. यापूर्वी पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत पदके जिंकली होती. यंदा मात्र पदकाविना भारताचे बॅडमिंटनमधील आव्हान समाप्त झाले.

Advertisement

रविवारी डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेनकडून उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सोमवारी लक्ष्य सेन व मलेशियाचा ली जी झिया यांच्यात कांस्यपदकासाठी सामना झाला. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या लक्ष्यने पहिला गेम 21-13 असा सहज जिंकला. लक्ष्यच्या अफलातून स्मॅशचे मलेशियन खेळाडूकडे काहीच उत्तर नव्हते. यानंतर दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने शानदार सुरुवात करत 8-2 अशी आघाडी घेतली. यानंतर लक्ष्यकडून काही चुका झाल्या, याचा फायदा मलेशियन लीने घेतला व त्याने 8-8 अशी बरोबरी साधली. मलेशियन लीने या गेममध्ये आपला खेळ उंचावला व आपली आघाडी 20-16 अशी वाढवली. यावेळी लक्ष्यच्या उजव्या हाताला दुखापत झाली, मेडिकल टीमकडून त्याने उपचार करुन घेतले. यानंतर मलेशियन लीने हा गेम 21-16 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.

निर्णायक गेममध्ये लक्ष्य सेन हतबल

दुसऱ्या गेममधील विजयाने मनोबल उंचावलेल्या सातव्या मानांकित ली झियाने तिसऱ्या गेममध्येही अफलातून खेळ केला याउलट लक्ष्य काहीसा दमलेला दिसला. ली झियाने सुरुवातीलाच 9-2 अशी आघाडी घेतली. यावेळी लक्ष्यचे लक्ष काहीसे विचलित झालेले पहायला मिळाले, यातच दुखापतीने पुन्हा त्याला त्रस्त केल्याने वैद्यकीय मदत घ्यावी लागली. यानंतर मात्र ली झियाने आपली आघाडी वाढवत हा गेम 21-11 असा जिंकला व कांस्यपदकाला गवसणी घातली.

पहिलेच ऑलिम्पिक अन् जबरदस्त खेळ

कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळत असलेल्या 22 वर्षीय युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन साकारले. उपउपांत्यपूर्व फेरीत मायदेशी सहकारी एचएस प्रणॉय, उपांत्यपूर्व फेरीत तैपईच्या चोऊ तियानचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीतही डेन्मार्कच्या जगजेत्या अॅक्सलसेनविरुद्ध निकाराची लढत दिली पण तो हरला. यानंतर कांस्यपदकासाठी लढतीत जखमी असतानाही युवा भारतीयाने जबरदस्त खेळ केला पण तो विजय मिळवू शकला नाही.

भारतीय जोडीचे कांस्यपदक हुकले, चीनकडून पराभूत

भारताच्या अनंतजीत सिंग आणि महेश्वरी चौहान या जोडीला स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाचा सामना गमवावा लागला आहे. भारतीय जोडीचे पदक अवघ्या एका गुणाने हुकले. या जोडीने 43 गुण मिळवले, तर चीनच्या जोडीने 44 गुण मिळवून कांस्यपदक जिंकले. अखेरपर्यंत या दोन्ही जोड्यांमध्ये चुरशीचा सामना झाला, मात्र अखेरच्या क्षणी चीनने बाजी मारत कांस्यपदक जिंकले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील चौथे कांस्यपदक अगदी थोडक्यात हुकले.

Advertisement
Tags :

.