संरक्षणमंत्र्यांचा लेहमध्ये जवानांसोबत ‘होलिकोत्सव’
सीमेवर गुलालाची उधळण : खराब हवामानामुळे सियाचीन दौरा टाळला
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात होळीचा उत्साह वाढत असताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे सैनिकांसोबत होळी साजरी करण्यासाठी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील लेह येथे पोहोचले. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर बी. डी. मिश्रा, वरिष्ठ प्रशासन आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी लेह विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राजनाथ सिंग यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज पांडेही सैन्यासोबत होळी साजरी करण्यासाठी आले होते. संरक्षणमंत्र्यांनी लेह येथील ‘हॉल ऑफ फेम’ येथे देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना स्मरण करून आदरांजली वाहिली. तसेच संरक्षणमंत्र्यांनी जवानांना गुलाल लावून मिठाईचे वाटपही केले.
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर शूर सैनिक तैनात असल्यामुळे आज देशातील जनता सुरक्षितपणे घरोघरी होळी साजरी करते, असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले. देशातील शूर सैनिकांचे मनेबल वाढवण्यासाठी संरक्षण मंत्री लेहला पोहोचले. यावेळी होळीचा सण साजरा करताना सैनिकांनी गुलालाची उधळण करून एकमेकांना मिठाई खाऊ घातली. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनला भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हवामानातील बदलामुळे त्यांना अर्ने सियाचीन दौरा बदलावा लागला.
सियाचीन येथे संरक्षणमंत्री सैनिकांसोबत होळी साजरी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांनी आपला बेत बदलत लेहच्या दिशेने मार्गक्रमण केले. काराकोरम पर्वतरांगेत सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वोच्च लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जाते, जिथे सैनिकांना गोठवणाऱ्या थंड आणि जोरदार वाऱ्यांशी झगडावे लागते. येथील हवामानात सध्या सातत्याने बदल जाणवत असल्यामुळे संरक्षणमंत्र्यांना रविवारी तेथे पोहोचता आले नाही.
सणांमुळे प्रेम-बंधुभाव वाढतो!
होळीनिमित्त राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी होळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा सण लोकांमध्ये प्रेम, एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो, असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. होळी हा सण आपला सांस्कृतिक वारसा मजबूत करण्यासाठी प्रेरणा देतो. हा एक चैतन्यशील आणि आनंदाचा सण असून तो आपले जीवन आशेने आणि उत्साहाने भरतो. होळीचे विविध रंग आपल्या देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत. हा सण लोकांमध्ये प्रेम, एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो. रंगांचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येवो आणि आपल्या सर्वांना नव्या उमेदीने राष्ट्र उभारणीसाठी काम करण्याची प्रेरणा मिळो, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.