संरक्षणमंत्री दोन दिवस अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर
किरेन रिजिजू यांचाही समावेश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू दोन दिवसांच्या अऊणाचल प्रदेश दौऱ्यावर बुधवारी दाखल झाले. दोघेही बुधवारी सकाळी राजधानीच्या पालम तांत्रिक विमानतळावरून तवांगला रवाना झाले. या दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधतील आणि संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया हँडल ‘एक्स’वर ही माहिती दिली आहे. अऊणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीहून तवांगला रवाना होत आहे. सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधण्यासाठी आणि शूर भारतीय सैन्य अधिकारी मेजर रालेंगनाओ बॉब खाथिंग यांना समर्पित संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक असल्याची पोस्ट त्यांनी केली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अऊणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील तवांगमध्ये दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये तवांगला भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी सैनिकांसोबत शस्त्रपूजन केले होते. मागील वर्षी संरक्षणमंत्र्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधत दसरा साजरा केला होता.