बोपण्णा-एब्डन उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी येथे सुरू असलेल्या एटीपी 1000 पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिसरे मानांकन मिळालेल्या बोपण्णा-एब्डन यांनी ब्राझील व जर्मनीच्या मार्सेलो मेलो व अलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यावर 6-4, 7-6 अशी मात केली. सव्वा तास ही झुंज रंगली होती. विजयी जोडीने पहिल्या सर्व्हवर 91 टक्के यश मिळविताना चार बिनतोड सर्व्हिसही केल्या. महत्त्वाचा ब्रेक मिळवित त्यांनी पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमधील पाचव्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ब्रेक मिळविण्याची संधी त्यांना मिळाली होती. पण मेलो व व्हेरेव्ह यांनी आपली सर्व्हिस राखत सेट टायब्रेकरवर नेला आणि बोपण्णा-एब्डन यांनी टायब्रेकरसह सामना जिंकून आगेकूच केली. मागील आठवड्यात त्यांनी मोसमाच्या अखेरीस होणाऱ्या एटीपी फायनल्समधील स्थानही निश्चित केले आहे.