विद्यमान विजेता मुंबई उपांत्य फेरीत
कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक, डायसचे 5 बळी
वृत्तसंस्था / कोलकाता
कर्णधार अजिंक्य रहाणेचे दमदार शतक तसेच रॉयस्टन डायसच्या 5 बळींच्या जोरावर विद्यमान रणजी विजेत्या मुंबई संघाने येथे सुरू असलेल्या 2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना हरियाणाचा 152 धावांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 315धावा जमविल्या. त्यानंतर हरियाणचा पहिला डाव 301 धावांवर आटोपला. मुंबईने पहिल्या डावात 14 धावांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात 339 धावा जमवित हरियाणाला निर्णायक विजयासाठी 354 धावांचे कठीण आव्हान दिले. पण मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हरियाणाचा दुसरा डाव 57.3 षटकात 201 धावांत आटोपला.
अजिंक्य रहाणेने 88 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्याने आपले प्रथम श्रेणीतील 41 वे शतक झळकविले. त्याने 13 चौकारांसह 180 चेंडूत 108 धावा जमविल्या. सिद्धेश लाडने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. रहाणेने सुमितकुमार आणि कंबोज यांच्या गोलंदाजीवर प्रत्येकी 1 चौकार मारुन शतकाच्या समिप वाटचाल केली. त्यानंतर त्याने एकेरी धाव घेत आपले शतक 160 चेंडूत झळकविले. मुंबईने 4 बाद 278 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. 44 धावांवर नाबाद राहिलेला शिवम दुबे आणखी चार धावांची भर घालत तंबूत परतला. मुंबईने यानंतर शेवटचे 5 गडी केवळ 10 षटकामध्ये 25 धावांत गमविले. हरियाणातर्फे अनुष ठकरालने 70 धावांत 4 गडी तर कंबोज, सुमितकुमार आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हरियाणा संघाने या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण रॉयस्टन डायस आणि शार्दुल ठाकुर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर हरियाणाचा दुसरा डाव 57.3 षटकात 201 धावांत आटोपला. लक्ष दलाल आणि सुमितकुमार यांनी सहाव्या गड्यासाठी 90 धावांची भागिदारी केली. दलालने 9 चौकारांसह 64 तर सुमितकुमारने 10 चौकारांसह 62 धावा जमविल्या. मुंबईच्या रॉयस्टन डायसने 39 धावांत 5 तर शार्दुल ठाकुरने 26 धावांत 2 गडी बाद केले. हरियाणाच्या दुसऱ्या डावामध्ये शेवटच्या तासभरात त्यांचे पाच गडी बाद झाले. डायसने पहिल्यांदाज रणजी स्पर्धेत एका डावात पाच गडी बाद केले. मुंबईच्या शार्दुल ठाकुरने हरियाणाच्या पहिल्या डावात 6 गडी तर दुसऱ्या डावात 3 गडी असे एकूण 9 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 315, हरियाणा प. डाव प. डाव 301, मुंबई दु. डाव 85.3 षटकात सर्वबाद 339 (अजिंक्य रहाणे 108, सुर्यकुमार यादव 70, शिवम दुबे 48, ठकराल 4-70, कंबोज, सुमितकुमार, जयंत यादव प्रत्येकी 2 बळी), हरियाणा दु. डाव 57.3 षटकात सर्वबाद 201 (लक्ष दलाल 64, सुमितकुमार 62, डायस 5-39, ठाकुर 3-26)