पक्षांतर हा राजकीय, सामाजिक गुन्हा: युरी
दोन वर्षांनंतरही अपात्रता याचिका निकाली नाही
प्रतिनिधी/ पणजी
पक्षांतर हा राजकीय आणि सामाजिक गुन्हा आहे. सत्ता बळकावण्यासाठी भाजप त्याचा वापर करत आहे. यासंबंधी अपात्रतेची याचिका 90 दिवसांत निकाली काढण्यात सभापती अयशस्वी झाले आहेत. सध्या चाललेली दिरंगाई पाहता ते 900 दिवस पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत, असे वाटते, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. अशाप्रकारे पक्षांतराला प्रोत्साहन देण्याच्या भाजपच्या रणनीतीचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप देशभरात पक्षांतराला प्रोत्साहन देत आहे. भाजप हा पक्षांतराचा कारखाना बनला आहे, जिथे ते आमदारांना बोलवतात आणि ‘वॉशिंग’ मशीनमध्ये त्यांचे मतपरिवर्तन करतात. ही लोकशाहीची हत्या आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे. मात्र याचे प्रायश्चित्त त्यांना भोगावे लागणार असून 2027 च्या निवडणुकीत मतदार त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत, असा विश्वास आलेमाव यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या ‘वॉशिंग’ मशीनमध्ये जाणाऱ्यापैकी आम्ही नाहीत
एक मात्र खरे की भाजपने अशी कितीही ‘वॉशिंग’ मशीन आणली तरी आम्ही तिघेही आमदार त्यांना बळी पडणार नाहीत. कारण आम्ही विक्रीयोग्य वस्तू नाहीत. आम्हाला विवेक आहे. आम्ही कोणालाही जनतेच्या जनादेशाचा भंग करू देणार नाही आणि त्यांच्या पाठीत कधीच खंजिर खुपसणार नाहीत, अशी ग्वाही आलेमाव यांनी दिली आहे.
भाजप स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतो हे खरे आहे. कारण त्यांचा ‘भ्रष्टाचार आणि पक्षांतरे’ ही इतरांपेक्षा वेगळी आणि भयानक आहेत, असा टोला आलेमाव यांनी लगावला आहे.