महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत पहिल्याच फेरीत पराभूत

06:10 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ निंगबो, चीन

Advertisement

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. त्याला अग्रमानांकित शि यु की याने हरविले.

Advertisement

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱ्या सेनने झुंजार खेळ केला. पण चीनच्या अव्वल मानांकित शि यु कीने सरस खेळ करीत सेनचे आव्हान 21-19, 21-15 असे संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली. 53 मिनिटे ही झुंज रंगली होती. सेनने पहिल्या फेरीत शि यु कीला जबरदस्त झुंज दिली. कोर्टवर चपळ हालचाली करीत त्याने यु कीला दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवून ठेवले आणि नंतर स्मॅशेस व अचूक ड्रॉप शॉट्सच्या जोरावर ब्रेकेला 11-7 अशी आघाडी घेतली होती. 14 व्या गुणापर्यंत त्याने आपले वर्चस्व राखले होते. पण नंतर कीने पकड मिळविण्यास सुरुवात केली आणि दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवून त्याने सेनला थकवले. क्रॉसकोर्ट स्मॅशेसवर त्याने सलग पाच गुण घेत 16-14 अशी आघाडी घेतली. सेननेही हार न मानता झुंज देत त्याला 19-19 वर गाठले. मात्र हा गेम शि यु कीने जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही असाचा तोडीस तोड खेळ पहावयास मिळाला. ब्रेकपर्यंत दोघे जवळपास समान होते. सेनने चपळता दाखवून 9-8 अशी आघाडीही घेतली. हाच जोम कायम ठेवत ही आघाडी 11-12 अशी आणली. यानंतर मात्र अनियंत्रित चुका वाढल्याने सेनने यु कीला सोपे गुण दिले. यु कीने नियंत्रण मिळवित नंतर गेमसह सामना संपवला.

भारतीय खेळाडूंना येथे अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. अन्य एक खेळाडू प्रियांशू राजावतलाही पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. मलेशियाच्या आठव्या मानांकित ली झी जियाने त्याला 21-9, 21-13 असे एकतर्फी हरवित दुसरी फेरी गाठली.

रुतुपर्णा व श्वेतपर्णा या पांडा भगिनींनाही महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या सातव्या मानांकित झँग शु झियान व झेंग यु डब्ल्यू यांनी त्यांना 21-8, 21-13 असे हरविले.

Advertisement
Next Article