महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम पडताळणीची मागणी
जिल्ह्यात 44 ईव्हीएमची तपासणी,पडताळणी होणार
कोल्हापूर :
जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पाच पराभूत उमेदवारांनी लेखी अर्जाद्वारे ईव्हीम मशीनची तपासणी आणि पडताळणीची मागणी केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील एकूण 44 मतदान केंद्रावरील ईव्हीएमची तपासणी,पडताळणी जानेवारी 2025 मध्ये होणार आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी झालेले मतदान आणि ईव्हीएम मधील यामध्ये तफावती असल्याच्या तक्रारी होत आहेत. सोशल मिडियावरुन याबाबतचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर पर्यंत ईव्हीएम मशीन तपासणी आणि पडताळणीच्या मागणीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत दिली होती. त्याप्राणे चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर यांनी पाच मतदान केंद्रावरील, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या वतीने 10, करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी 14, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश लाटकर यांच्यावतीने 10, हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू आवळे यांच्या वतीने 10 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तपासणी आणि पडताळणीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
दाखल अर्ज निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहेत. हे अर्ज भेल कंपनीकडे जावून त्यांचे वेळापत्रक तयार होईल. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि कंपनीचे अभियंते यांच्या उपस्थितीत तपासणी आणि पडताळणी होणार आहे.