गुंजीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने हरणाचा मृत्यू
गुंजी : गुंजीजवळ तिवोलीवाडा क्रॉसवर राष्ट्रीय महामार्गावरून रस्ता पार करत असलेल्या एका हरणाला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सदर घटनेची माहिती अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळताच गुंजी सेक्शन फॉरेस्टर राजू पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची पाहणी केली. तसेच याची माहिती लोंढा वनाधिकाऱ्यांना दिली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक हरण जंगलातून महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची ठोकर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती येथील सेक्शन फॉरेस्टर राजू पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हरणाला पाहिले असता ते मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लोंढा वनाधिकारी वाय. पी. तेज आणि खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबर्गी यांनीही घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. सदर हरण नर जातीचे असून त्याचे वय चार ते पाच वर्षे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. सदर घटना सर्व्हे क्रमांक 95 मध्ये घडली असून हा सर्व्हे क्रमांक नायकोल आणि तिवोलीवाडा दरम्यानच्या जंगलाचा आहे. सदर हरणावर पंचनाम्याचे सोपस्कार करून अंत्यसंस्कार करण्यात आले.