दीप्ती, क्रांती, श्रीचरणी यांना मोठे करार मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुऊवारी येथे होणाऱ्या महिला प्रीमियर लीग लिलावात लॉरा वोल्वार्ड आणि भारताची विश्वचषक नायिका दीप्ती शर्मा यांच्यासह आघाडीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या वाट्याला मोठे करार चालून येण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय खेळाडू क्रांती गौड आणि श्रीचरणी यांना खेचण्यासाठीही बोली युद्ध होण्याची शक्यता आहे.
एकूण 277 खेळाडू, 194 भारतीय आणि 83 परदेशी, पहिल्याच मेगा लिलावात झळकतील. पाच संघ जास्तीत जास्त 73 जागा भरण्याचा प्रयत्न करतील ज्यामध्ये 50 भारतीय आणि 23 परदेशी असतील. संघाचा किमान आकार 15 सदस्यांचा आहे आणि कमाल मर्यादा 18 आहे. ऐतिहासिक एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक जेतेपदानंतर भारतीय खेळाडूंना मोठी मागणी असेल. क्रांती आणि श्रीचरणीसारख्या तऊण खेळाडूंना दीप्तीसारखा करार मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताच्या विजयी मोहिमेत स्वत:ला सिद्ध केले आहे. हरलीन देओल, रेणुका सिंह आणि स्नेह राणा देखील लिलावात समाविष्ट आहेत.
निवृत्त ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग, सध्याची ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली, इंग्लंडची आघाडीची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन, न्युझीलंडची अनुभवी सोफी डेव्हिन, तिची सहकारी अमेलिया केर आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार वोल्वार्ड यांचाही यात समावेश आहे. वोल्वार्ड एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये राहिली होती. तिने इंग्लंडविऊद्धच्या उपांत्य सामन्यात आणि विजेत्या भारताविऊद्धच्या अंतिम सामन्यात शतके झळकावली. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लॅनिंग महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये फलंदाजीच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसलेली आहे आणि लिलावाच्या टेबलावर अनेक संघांकडून याचा विचार केला जाईल.
ऑस्ट्रेलियन फोबी लिचफिल्ड ही आणखी एक स्टार खेळाडू आहे आणि तिला करारबद्ध करण्यासाठी चुरस लागेल, अशी अपेक्षा आहे. फक्त एका खेळाडूला कायम राखलेल्या यूपी वॉरियर्सकडे लिलावात सर्वांत जास्त 14.5 कोटी ऊपये आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वांत कमी 5.70 कोटी ऊपये आहेत. सहसदस्य देशाच्या चार खेळाडू तीर्था सतीश आणि एशा ओझा (दोघीही यूएई), तारा नॉरिस (अमेरिका) आणि थिपाच पुथावोंग (थायलंड) यांचाही लिलावाच्या यादीत समावेश आहे. ही स्पर्धा 7 जानेवारी रोजी सुरू होण्याची अपेक्षा आहे.