दीपोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
बेळगाव : उत्सवाच्या सम्राज्ञीचे उद्यापासून आगमन होत आहे. अर्थातच तिच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे. दिवाळी येण्याची चाहूल सर्वप्रथम मिळते ती पणती आणि टांगलेल्या आकाशकंदीलांमुळे. दरवर्षी आकाशकंदीलांच्या नमुन्यांमध्ये भर पडत असून सर्वत्र टांगलेल्या आकाशकंदीलांनी शहर रंगीबेरंगी झाले आहे. बुरुड गल्ली, नरगुंदकर भावे चौक तसेच शहर व उपनगरांतील सर्व बाजारपेठांमध्ये पणत्यांची विक्री सुरू झाली आहे.
शनिवार ते मंगळवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. बेळगावला गोव्याचे लोकही खरेदीसाठी येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळही वाढली. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत खरेदी झाली. संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे खरेदी थंडावली. विक्रेत्यांना आपले साहित्य आवरताना त्यांची पुरेवाट झाली. वरुणराजा आता बरसू नकोस, ग्राहकांना खरेदी करू दे आणि आमची दिवाळीसुद्धा आनंदात जाऊ दे, अशी विनवणीच जणू विक्रेत्यांनी केली.
या उत्साहाच्या प्रकाशपर्वाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. शनिवारी (ता. 18) रोजी अश्विन कृष्ण व्दादशी असून याला गुऊद्वादशी असे म्हटले आहे. याच दिवशी सायंकाळनंतर त्रयोदशी ही तिथी असल्याने धनत्रयोदशी याच दिवसापासून साजरी होणार आहे. धन्वंतरीचे पूजन, धन-संपत्तीचे पूजन करण्याचा हा दिवस घरोघरी होत असतो. याच दिवसापासून दिवाळीपर्वाची सुऊवात होणार असून घराघरातून दीप-आकाशकंदील उजळणार आहेत.
मंगळवारी लक्ष्मीपूजन
सोमवारी (ता. 20) रोजी नरक चतुर्दशी असून घरोघरी पहाटे अभ्यंगस्नान होणार आहे. याच दिवशी दुपारी 3.44 नंतर अमावास्या सुरू होत असून मंगळवारी (ता. 21) रोजी सायंकाळी 5.54 पर्यंत अमावास्येचा कार्यकाल आहे. 20 रोजी प्रदोषकाळात अमावास्या असल्याने त्या दिवशी लक्ष्मीपूजन न करता मंगळवारी (ता. 21) लक्ष्मीपूजन करावे, अशी माहिती विविध पंचांगांतून देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी 6.11 ते रात्री 8.40 यावेळेत लक्ष्मीपूजन करता येते. काहीजण बलिप्रतिपदेला (पाडवा) लक्ष्मीपूजन व वहीपूजन करीत असतात. बुधवार दि. 22 रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा असून तिला बलिप्रतिपदा किंवा पाडवा असे म्हटले जाते. यंदा बलिप्रतिपदेला सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी 6.10 पर्यंत लक्ष्मीपूजन व वहीपूजनास मुहूर्त आहे.
गुरुवारी भाऊबीज
गुरुवारी (ता. 23) कार्तिक शुक्ल व्दितीया असून या दिवसाला यमद्वितीया, भाऊबीज असेही म्हटले आहे. भाऊ-बहीण यांच्यात आदर, प्रेम, विश्वास निर्माण करणारा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला असून भाऊबीज वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असते. भाऊबीजेनंतर दिवाळीपर्वाची सांगता होणार आहे.