वर्ल्ड कप फायनल तिरंदाजीत दीपिकाला रौप्य
वृत्तसंस्था/ त्लाक्सकाला, मेक्सिको
भारताची अव्वल रिकर्व्ह महिला तिरंदाज दीपिका कुमारीने येथे सुरू असलेल्या वर्ल्ड फायनल तिरंदाजी स्पर्धेत पाचवे रौप्यपदक पटकावले. अंतिम लढतीत तिला चीनच्या लि जियामनकडून 0-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
तीन वर्षांच्या खंडानंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये पुनरागमन केलेल्या दीपिकाला आठ खेळाडूंच्या स्पर्धेत तिसरे मानांकन मिळाले होते. उपांत्य फेरीपर्यंत तिला कोणताही अडथळा आला नाही. मात्र अंतिम फेरीत चौथ्या मानांकित लि जियामनविरुद्ध खेळताना तिच्यावर सुवर्ण मिळविण्याचे दडपण आले असावे. वर्ल्ड कप फायनल स्पर्धेत खेळण्याची दीपिकाची ही नववी वेळ होती, याआधी तिने कांस्यपदकही मिळविलेले आहे. डोला बॅनर्जी या एकमेव भारतीय तिरंदाजाने फायनल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. 2007 मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेत तिने हे सुवर्णयश मिळविले होते.
पुरुषांच्या रिकर्व्ह विभागात धीरज बोम्मदेवराने दक्षिण कोरियाच्या ली वू सेओकविरुद्ध पहिल्या फेरीत 4-2 अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण त्याला अखेर त्याला पराभूत व्हावे लागले. भारतीय तिरंदाजांवर दडपणाचा परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. प्रमुख स्पर्धांमध्ये ते नेहमीच अडखळताना दिसले आहेत. भारताने या स्पर्धेत पाच पथकांचा चमू पाठविला होता, त्यात कंपाऊंड विभागात 3 व रिकर्व्ह विभागात दोन तिरंदाजांचा समावेश होता. वर्षातील या शेवटच्या वर्ल्ड कप फायनला स्पर्धेत भारताला फक्त एका पदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीत दीपिकाने मेक्सिकोच्या अलेजांद्रा व्हॅलेन्सियावर 6-4 असा मोठा विजय मिळविल्यानंतर दीपिकाला हा जोम पुढे टिकविता आला नाही. अंतिम फेरीत तिने पहिला सेट 26-27 असा गमविला. दुसऱ्या सेटमध्ये तिने सुधारित कामगिरी केली. पण लि ने 30 गुण मिळवित हा सेट 30-28 असा जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. तिसरा सेट मात्र निर्णायक ठरला. दीपिकाने मारलेला दुसरा तीर लाल रिंगमध्ये बसल्याने तिला 7 गुण मिळाले. लि ने तीनदा 9 गुणांची कमाई करीत हा सेट 27-25 असा घेत सुवर्णपदक निश्चित केले. लि फायनलमध्ये प्रथमच खेळत होती.
पुरुषांच्या रिकर्व्हमध्ये तिसरा मानांकित धीरज हा या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला एकमेव भारतीय तिरंदाज. दुसऱ्या मानांकित ली वू सेओकविरुद्ध चांगली सुरुवात केली. पहिला सेट बरोबरीत सोडविला तर दुसरा सेट जिंकून आघाडी घेतली. पण तिसऱ्या सेटमध्ये लढत संपवण्याची चांगली संधी असूनही त्याने ती दवडली आणि केवळ एका गुणाने हा सेट त्याला गमवावा लागला. नंतर चौथा व पाचवा सेट ली ने ही लढत 6-4 अशी जिंकून ही धीरजचे आव्हान संपुष्टात आणले.
कंपाऊंड विभागात भारताच्या एकाही तिरंदाजाला पदक मिळविता आले नाही. प्रथमेश फुगे उपांत्य फेरीत पराभूत झाला तर प्रियांश व ज्योती सुरेखा व्हेन्नम यांना पदकाची फेरीही गाठता आली नाही.