दीपेश देवेंद्रन, किशन कुमारचा भेदक मारा
ऑस्ट्रेलिया युवा संघ 243 धावांत गारद, होगनचे शतक हुकले
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
पहिल्या युवा कसोटीत वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रनची भेदक गोलंदाजी आणि किशन कुमारकडून त्याला मिळालेली पूरक साथ यांच्या बळावर भारत यू-19 संघाने ऑस्ट्रेलिया यू-19 संघाचा पहिला डाव 243 धावांत गुंडाळला. देवेंद्रनने 5 तर किशन कुमारने 3 बळी मिळविले. ऑस्ट्रेलिया युवा संघातर्फे स्टीव्हन होगनने शानदार 92 धावा जमविल्या.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया यू-19 संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 30 धावांतच दोन बळी गमविले. दीपेश व किशन कुमार यांनी हे बळी मिळविले. ऑफस्पिनर अनमोलजीत सिंगने कर्णधार विल मॅलेसुकला 21 धावांवर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची स्थिती 3 बाद 78 अशी झाली. खिलन पटेल व दीपेश यांनी नंतर हॉलिक व यष्टिरक्षक सायमन बजला बाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 167 अशी झाली. मोठ्या भागीदारीच्या अभावाचा कांगारूंना फटका बसला. भारताच्या शिस्तबद्ध व अचूक माऱ्यापुढे त्यांना मोठी मजल मारता आली नाही.
17 वर्षीय दीपेशने 45 धावांत 5 बळी टिपले तर किशन कुमारने 48 धावांत 3 बळी मिळविले. होगनने संयम खेळ करीत 246 चेंडूत 92 धावा जमवित एकाकी लढत दिली. त्याच्या काही सहकाऱ्यांनी चांगली सुरुवात केली, पण त्याचे मोठ्या खेळीत त्यांना रुपांतर करता आले नाही. झेड हॉलिकने 94 चेंडूत 38 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया यू-19 संघाचा डाव 91.2 षटकांत आटोपला.
युवा कसोटीच्या आधी दोन्ही संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका झाली, त्यात आयुष म्हात्रेच्या भारत युवा संघाने 3-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला होता. यातील पहिला सामना 57 धावांनी, दुसरा 51 धावांनी तर तिसरा वनडे सामना 167 धावांनी जिंकला होता. या मालिकेतील दुसरी युवा कसोटी 7 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत मॅके येथील ग्रेट बरियर रीफ एरीना येथे होईल.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया यू-19 प. डाव 91.2 षटकांत सर्व बाद 243 : स्टीव्हन होगन 92, झेड हॉलिक 38, विल मॅनेसुक 21, दीपेश देवेंद्रन 5-45, किशन कुमार 3-48, अनमोलजीत सिंग व खिलन पटेल प्रत्येकी 1 बळी.