For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरी मतदानाची घटती टक्केवारी चिंताजनक !

06:23 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरी मतदानाची घटती टक्केवारी चिंताजनक
Advertisement

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के इतकेच मतदान झाले. महानगरातील 10 जागांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ही चिंताजनक असून ग्रामीण भागातील दिंडोरीत 57.06 टक्के तर पालघरमध्ये 54.32 टक्के वगळता मुंबई शहरातील सहाही मतदार संघात 50 टक्केचा आकडा पार झालेला नाही. काही ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह होता, पण मतदान केंद्रावरील व्यवस्थेमुळे निरूत्साह बघायला मिळाला. राज्यातील डर्टी पॉलीटिक्समुळे तरूण मतदारांमध्ये मात्र मतदान करण्याबाबतची उदासिनता दिसून आली तर ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचे मात्र प्रमाण मतदानात अधिक होते. भविष्यात शहरी भागातील तरूण मतदारांचा वाढता सहभाग हेच लोकशाहीसमोरील मोठे आव्हान असणार आहे.

Advertisement

मतदान हा आपला सर्वश्रेष्ठ अधिकार असून सगळ्यांनीच आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावलेच पाहिजे असे निवडणूक आयोगाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असले, तरी सोमवारी मुंबई आणि ठाणे शहरात झालेले मतदान बघता मतदानाची टक्केवारी ही चिंताजनकच असल्याचे दिसत आहे. मुंबईत अनेक मतदार केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याने एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा त्यात मतदान प्रक्रियेला होत असलेला विलंब बघता अनेकांनी मतदान न करता घरी जाणे पसंत केले. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचे बघायला मिळाले.

Advertisement

मुंबईतील अनेक मतदारसंघात एकीकडे झोपडपट्टीत राहणारा मतदार तर दुसरीकडे उच्चभ्रु इमारतीत राहणारा मतदार असा असमतोल आहे, मतदानाचा विचार करता झोपडपट्टीतील मतदार हा मतदानासाठी घराबाहेर पडतो, कारण ज्याला समस्यांचा सामना करावा लागतो त्याचाच संबंध लोकप्रतिनिधींशी येतो किंवा त्याला या पुढाऱ्यांकडून अपेक्षा असतात. त्याप्रमाणे झोपडपट्टीतील मतदार मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याचे चित्र होते. मात्र मतदार केंद्रावर आल्यानंतर या मतदारांची निराशा झाल्याचे बघायला मिळाले. अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडली तर काही ठिकाणी नावाचा घोळ बघायला मिळाला, त्यामुळे मतदार संघाबाहेरच अनेक ठिकाणी मतदार आणि मतदान अंमलबजावणी अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचे बघायला मिळाले. मतदान वाढविण्यासाठी मतदारांना घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान सगळ्याच राजकीय पक्षांपुढे असते मात्र केवळ मतदारांना बाहेर काढून उपयोग नाही तर घराबाहेर पडलेल्या मतदारांचे मतदान योग्य वेळेत जास्तीत जास्त कसे होईल याची खबरदारी घेणे आवश्यक असते.

मुंबईतील सहा मतदारसंघाचा विचार करता एकाही मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्केही मतदान झाले नव्हते, उत्तर मुंबईत 46.91 टक्के, उत्तर मध्य मुंबईत 47.32 टक्के, उत्तर पूर्व मुंबईत 48.67  टक्के, उत्तर पश्चिम मुंबईत 49.79 टक्के, दक्षिण मुंबईत नेहमीप्रमाणे सर्वात कमी म्हणजे 44.22 टक्के तर दक्षिण मध्य मुंबईत 48.26 टक्के इतके मतदान झाले. मुंबई महानगरातील मतदानापेक्षा ग्रामीण भागात होत असलेल्या नाशिकमध्ये 51.16  टक्के,

पालघरमध्ये 54.32  तर धुळ्यात 48.81 टक्के तर सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदार संघात 57.06 टक्के इतके मतदान झाले. 13 जागांचा विचार करता महानगरातील जागांपेक्षा ग्रामीण भागात झालेले मतदान अधिक असून शहरी भागातील घटणारी टक्केवारी ही चिंताजनक

आहे.

ग्रामीण आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असणाऱ्या गडचिरोलीमध्येही  64.95 टक्के इतके मतदान झाले होते तर बाजुलाच असणाऱ्या नागपूर या राज्याच्या उपराजधानीत केवळ 47.91 टक्के इतके मतदान झाले होते. काल झालेल्या राज्याच्या राजधानीतही हाच कित्ता कायम असल्याने शहरी भागातील घटणारी मतदानाची आकडेवारी हे लोकशाही समोरील मोठे आव्हान असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी बहुसंख्य नवमतदारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या नवमतदारांना निवडणुकीपूर्वी ते मिळू शकले नाही. मतदानाचा दिवस उजाडला तरी ओळखपत्र न मिळाल्याने नवमतदारांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला होता. मतदार ओळखपत्र मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नाव नोंदणी केली होती. काही दिवसांपूर्वी ईपीआयसी क्रमांकही देण्यात आला मात्र काही लोकांना मतदार ओळखपत्र न मिळाल्याने त्यांचे मतदार यादीतील नाव आणि अनुक्रमांक मिळत नसल्याने अखेर अनेक नवमतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

लोकशाही सुदृढ करायची असेल तर नवमतदारांचा सहभाग वाढणे महत्त्वाचे असते, राज्यातील डर्टी पॉलिटीक्समुळे नवमतदारांमध्ये मतदानाबाबत असलेली उदासिनता, तसेच ग्रामीण तरूणांच्या तुलनेत शहरी युवकांमध्ये मतदानाबाबत असलेली उदासिनता, हायप्रोफाईल तरूण वर्गाला एका ओटीपीवर सगळं काही सेकंदात मिळण्याची सवय लागल्याने मतदानासाठी रांगेत उभे राहुन वेळ घालवण्याच्या भानगडीतच हे तरूण पडले नाहीत. मतदान ऑनलाईन पध्दतीने घरी बसून करता आले पाहिजे अशी काही तरूणांनी प्रतिक्रिया दिली. त्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांसमोर शिक्षण, बेरोजगारी, शेतात पिकणाऱ्या पिकाला हमीभाव, कांद्याला दर, उसाला एफआरपी असे अनेक प्रश्न त्यांच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत असल्याने ग्रामीण युवक हा शहरी युवकांपेक्षा मतदान तसेच सरकारी योजना तसेच प्रशासकीय निर्णयांबाबत सजग असल्याचे पहायला मिळतो आणि याचे प्रतिबिंब हे आत्तापर्यंत झालेल्या राज्यातील चार टप्प्यातील मतदानात दिसले.

शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर मुंबई आणि ठाण्याच्या जागा या दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने मतदानाचा टक्का वाढेल अशी शक्यता होती. मात्र मतदानाचा म्हणावा तसा टक्का वाढलेला नाही, भाजपचे उमेदवार असलेल्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे तर शिवसेना विरूध्द शिवसेना असा सामना आहे. तेथे मतदान संथ गतीने होत असल्याचे दिसले.

सध्याची राजकीय परिस्थिती बघता मतदान केंद्रावर कधी काळी एकाच पक्षात असलेले राजकीय पुढारी मात्र एकमेकांच्या विरोधात जरी मतदान केंद्राबाहेर दिसत होते, मात्र जो उत्साह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजप युतीत असताना दिसायचा तो मात्र आज बघायला मिळाला नाही. सध्याचे राजकारण बघता निष्ठा, बांधिलकी, तत्व इतकेच काय पैशालासुध्दा महत्त्व राहीले नसून, आता राजकारण म्हणजे नशिबाचा भाग लॉटरी लागण्यासारखे झाले आहे. कारण राजकारण आता शाश्वत राहीले नसल्याने केवळ आपला स्वार्थ साधणे हाच हेतु आता राजकारणात राहीला आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.