कंपनी मुख्याधिकाऱ्यांचे घटते राजीनामे : प्रमाण आणि परिणाम
खासगी कंपन्यांसह कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वोच्चस्थानी म्हणजेच मुख्याधिकारी म्हणून काम करणाऱ्या उच्चपदस्थांचे राजीनामे व नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ही बाब अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असते. व्यवसाय-व्यवस्थापनापासून विविध धोरणात्मक निर्णय व व्यावसायिक नियोजन, स्थिरता, आर्थिक प्रगती इ. वर कंपनीचे संचालन करणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याने मोठे व दीर्घकालीन परिणाम होतात. बऱ्याचदा एखाद्या कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यामध्ये वारंवार बदल झाल्यामुळे अथवा बदल करावे लागण्याचा परिणाम संबंधीत कंपनीच्या गुणांकन वा व्यावसायिक पत इ. पर्यंत होताना दिसतात. त्यामुळेच व्यावसायिक कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचे राजीनामे व त्यांचे सोडून जाणे ही बाब व्यावसायिक संदर्भात दुर्लक्षून चालत नाही.
या पार्श्वभूमीवर गेल्या 5 वर्षात प्रतिनिधीक व नमूना पातळीवर खाजगी कंपन्यांच्या मुख्याधिकारी वा प्रबंध संचालक या पातळीवरील मंडळींच्या राजीनाम्याची आकडेवारी व प्रमाण यांचा गेल्या 5 वर्षातील उपलब्ध तपशीलाचा विचार महत्त्वाचा ठरतो. या संदर्भात सुरूवातीलाच नमूद करण्यासारखी बाब म्हणजे 2020 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराशी नोंदीकृत अशा 2528 कंपन्यांपैकी 117 कंपन्यांच्या प्रबंध संचालक वा तुलनात्मक पदावर काम करणाऱ्या उच्चपदस्थांनी राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये याच श्रेणीतील 2235 कंपन्यांच्या 142 मुख्याधिकाऱ्यांनी एक वर्षात राजीनामे दिले होते.
वरीलप्रमाणे नमूद केलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराशी संलग्न असणाऱ्या कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण आणि गेल्या 5 वर्षातील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.वरील प्रातिनिधीक स्वरूपाच्या आकडेवारी व तपशिलातून स्पष्ट होणारी बाब म्हणजे 2022 मध्ये या कालावधीत कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचे सोडून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. यामागे कोरोनादरम्यान झालेली व्यावसायिक स्थित्यंतरे व त्यादरम्यान झालेले सर्वांगीण बदल हे होते, असे पण स्पष्ट झाले.
याच अनुषंगाने उच्च व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे, प्रचलित वा निवृत्त कंपनी संचालक, व्यवस्थापन तज्ञ, वित्तीय क्षेत्रातील प्रमुख वा विविध विषय तज्ञ व सल्लागार यांच्या मते एकूणच व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रावर कोरोनानंतर मोठे बदल झाले. या बदलांचे वेगवेगळे आयाम पुढे आले व त्याचे दूरगामी व्यावसायिक परिणाम होत गेले. याच बदलत्या वा बदललेल्या व्यावसायिक परिणामांचा एक भाग म्हणून कोरोना दरम्यान वा त्यानंतरच्या काळातील कंपनी मुख्याधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांकडे बघून त्याचा नव्या संदर्भात अभ्यास करता येईल.
कॉर्पोरेट-व्यवस्थापन विषयातील तज्ञ व ‘इन-गव्हर्न’चे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम सुब्रमणियन यांच्यानुसार कोरोनानंतर व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात अनपेक्षित व मोठे बदल झाले. यामध्ये व्यवस्थापन शैली, ग्राहकांची मानसिकता, व्यावसायिक चढ-उतार, व्यवस्थापकांची निर्णय क्षमता, बदलती जोखिम, व्यावसायिक अस्थिरता व वैयक्तिक मानसिकता या आणि अशा महत्त्वाच्या कारणांमुळे मध्यंतरीच्या काळात कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांमध्ये बदल होणे अपरिहार्य होते व त्यांचे त्यादरम्यानचे राजीनामे त्याचाच परिपाक होता. मात्र आता व्यवसाय-व्यवस्थापन दोन्ही स्थिरावले असल्याचे पण श्रीराम सुब्रमणियन यांनी स्पष्ट केले आहे.
वरील मजकूर व आकडेवारी ही राष्ट्रीय शेअर बाजाराशी संबंधीत अशा कंपन्यांची असली तरी ज्या कंपन्या राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदीकृत नाहीत अशा कंपन्यांची परिस्थिती पण थोड्या-फार फरकाने अशीच आहे. यामध्ये तर काही मोठ्या व प्रस्थापित कंपन्यांचा पण समावेश आहे. या कंपन्यांपैकी तर काही कंपन्या या परंपरागत रित्या परिवार नियंत्रित-संचालित असतात हे विशेष. अर्थात या कंपन्यांमधील अनुभव पण वेगळे नसतात. उच्च-व्यवस्थापन पातळीवर उमेदवारांची निवड करण्याचे काम करणाऱ्या रूसेल रेनॉल्ड असोसिएटसचे व्यवस्थापकीय संचालक पंकज अरोरा यांच्या मते बदलत्या व्यवसाय चक्र व उद्योगातील नवी गुंतवणूक यामुळे नव्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांना व्यवसायवाढीच्या मोठ्या संधी मिळत आहेत. त्यांना प्रसंगी विदेशी कंपन्यांमध्ये संधी व आकर्षक पगार मिळत असल्याने आपल्याकडील अनेक प्रस्थापित कंपन्यांचे मुख्याधिकारी या कंपन्यांकडे वळणे स्थाभाविक ठरते.
‘ब्रिटानिया’ चे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक विनीता बाली त्यांच्या अनुभवातून नमूद करतात की, बरेचदा विविध कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांना विदेशी व्यवसाय, तंत्रज्ञान व गुंतवणूक असणाऱ्या कंपन्यांचे विविध कारणांनी आकर्षण वाटते. त्यामुळे सुद्धा प्रस्थापित कंपन्यांचे मुख्याधिकारी अशा विशेष कारणांनी आपली प्रचलित नोकरी सोडून इतर कंपन्यांमध्ये जातात.
राष्ट्रीय शेअर बाजाराशी निगडीत कंपन्यांच्या संदर्भात ‘कॉर्न फेरी’ या कंपन्यांमधील उच्चपदस्थ व मुख्याधिकारी यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीचे प्रमुख नवनीत सिंह यांच्या मते, कंपनी वा कॉर्पोरेट क्षेत्रात मुख्याधिकारी असणाऱ्यांना पद-पैसा- प्रसिद्धी इ. सर्व हवे असते. यासाठी अधिक परिश्रम व मोठी जोखीम घेण्याची त्यांची तयारी असते. या मंडळींचा सर्वसाधारणपणे वयोगट असा असतो की ते त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या इच्छा व अपेक्षेनुरूप बदल सहजपणे करू शकतात. याची परिणीती अशा मुख्याधिकाऱ्यांचे राजीनामे व नोकरी बदलण्यात व त्यासाठी राजीनामे देण्यात होते. मात्र बऱ्याचदा व विशेषत: वयाची चाळीशी ओलांडणारे उच्चपदस्थ व्यवस्थापक त्यांच्या आयुष्य व कारकीर्दीत स्थिरतेला व स्थैर्य आणि कामाच्या सुलभतेला प्राधान्य देतात. त्यामुळे ही मंडळी विचारपूर्वक नोकरी बदलतात वा नोकरी बदलण्याचे टाळतात याकडे ‘कॉर्न फेरी’चे नवनीत सिंह यांनी नेमके लक्ष वेधले आहे. याचेच प्रत्यंतर अशा मुख्याधिकाऱ्यांच्या वाढत्या स्थिरतेमध्ये दिसून आले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदीकृत कंपन्यांच्या 2024 मध्ये ज्या मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांचे उद्योग-व्यवसाय निहाय विश्लेषण वेगळ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. यासंदर्भात अधिकृतपणे उपलब्ध माहितीनुसार 2024 मध्ये नोकरी सोडणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 23 मुख्याधिकारी हे ग्राहकोपयोगी उद्योग क्षेत्रातील होते. त्याखालोखाल उद्योग-व्यवसायनुसार उपलब्ध संख्या म्हणजे 2024 मध्ये वित्तीय सेवा-संस्था क्षेत्रातील 20, उत्पादन क्षेत्र 18, बांधकाम 17, अन्न प्रक्रिया 9, सेवाक्षेत्र 7, युटिलिटीज क्षेत्र 7, ऊर्जा उद्योग 5, संगणक क्षेत्र 5, संदेशवहन 2 व आरोग्य सेवा क्षेत्र 2 याप्रमाणे आपल्या नोकरीमध्ये बदल केला आहे. ही आकडेवारी पुरेशा प्रमाणात बोलकी आहे.
यातून देशांतर्गत विविध कंपन्यांच्या मुख्याधिकारी व सर्वोच्च पदावरील व्यक्तींच्या नोकरी बदलण्याच्या संदर्भातील मुख्य बाब म्हणजे उद्योग-व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या बदलांना आर्थिक-औद्योगिक व व्यवसाय वृद्धी या पैलूंप्रमाणेच मुख्याधिकारी व तत्सम उच्च पदावरील व्यक्तीसाठी त्यांच्या अधिकार वृद्धी, करिअर वृद्धी, आकर्षक पद-पगारवाढ व प्रसंगी सध्या पेक्षा अधिक आकर्षक पगारमान व प्रतिष्ठापर सोई इ. नेहमीच महत्त्वाच्या ठरल्या तरी त्यांना पण स्थिरतेसह असणारी कामगिरी हवी असते हाच संदेश वरील विवेचनातून मिळतो.
-दत्तात्रय आंबुलकर