गाईला ‘राष्ट्रमाता’ जाहीर करा!
मागणीसाठी राष्ट्रव्यापी यात्रेचे आयोजन : 15 ऑक्टोबर रोजी गोव्यात महासभा,जगद्गुरू शंकराचार्य राहणार उपस्थित
पणजी : गाय हा केवळ एक प्राणी नसून ती माता आहे, याबद्दल सनातन धर्मीय हिंदूंची पवित्र श्रद्धा आणि निष्ठा आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये गाईची महती वर्णीलेली आहे. म्हणुनच गाईला ’राष्ट्रमाता’चा दर्जा मिळवून देण्यात यावा. तसेच गोहत्येवर देशभरात बंदी घालण्यात यावी अशी मागणी गौध्वज स्थापना भारत या संघटनेकडून करण्यात आली आहे. काल बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेस संघटनेचे सहसंयोजक विकास पटनी, अखिलेश ब्रह्मचारी, राज्य संयोजक राजीव झा, दक्षिण गोव्याचे रवींद्र रेडकर, स्वामी श्रीहरी, श्रद्धानंद सरस्वती, संजय यादव, सुशांत दळवी आदींची उपस्थिती होती.
या चळवळीस गती देण्यासाठी ज्योतिर्मठाचे जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी गाईच्या तुपाची पवित्र ज्योत प्रज्वलित केली आहे. तसेच हे वर्ष गौ संवत्सर (गाईचे वर्ष) म्हणून घोषित केले आहे. त्याचाच भाग म्हणून यापूर्वी 14 ते 28 मार्च 2024 दरम्यान त्यांनी गोवर्धन ते दिल्ली अशी अनवाणी पदयात्रा केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता भारतभर गौ प्रतिष्ठा आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे पटनी यांनी सांगितले. या चळवळीचा भाग म्हणून 22 सप्टेंबरपासून गौध्वज स्थापना भारत यात्रा प्रारंभ करण्यात आली आहे. दि. 26 ऑक्टोबर रोजी या यात्रेचा दिल्लीत समारोप होणार आहे. यात्रेदरम्यान जगद्गुरु शंकराचार्यजी देशभरातील प्रतिष्ठित गौभक्तांना सन्मानित करतील. या संपूर्ण प्रवासात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्यांना भेट देण्यात येईल. तेथे पवित्र गौध्वज स्थापित करण्यात येईल, व प्रत्येक ठिकाणी गौ प्रतिष्ठा संमेलन आयोजित करण्यात येईल, अशी माहिती पटनी यांनी दिली.
दि. 15 ऑक्टोबर रोजी ही यात्रा गोव्यात पोहोचणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदजी आणि जगद्गुरू शंकराचार्य सदानंद सरस्वतीजी यांच्या उपस्थितीत दुपारी 12 ते 3 या वेळेत पणजीत गौ महासभा होईल. त्यानंतर यात्रा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल. या यात्रेनंतर दि. 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी गोपाष्टमीच्या मुहूर्तावर दिल्लीत देशव्यापी गौ प्रतिष्ठा महासंमेलन होईल. त्यावेळी गोहत्येचा शाप संपविण्यासाठी आणि गायीचा सन्मान करण्यासाठी गाईला ’राष्ट्रमाता’चा दर्जा देण्यासंबंधी निर्णायक आवाहन करण्यात येईल, असे पटनी यांनी सांगितले.