बेळगाव-वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्ग घोषित करून विकास करा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून या मार्गाचा विकास करावा आणि कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा या तीन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे या तीन राज्यांतील जनतेचा खऱ्या अर्थाने विकास होईल, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना बेळगाव तालुक्यातील व पश्चिम भागातील नागरिकांच्यावतीने निपाणी येथे शुक्रवारी भेट घेऊन देण्यात आले. बेळगाव हे औद्योगिक, ऐतिहासिक आणि पर्यटन केंद्र असून बेळगावच्या शेजारील तालुक्यातील लोकांसाठी सुसज्ज बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक केंद्र आहे. महाराष्ट्र, गोवा आणि सिंधुदुर्ग शहरातील लोकांसाठी अनेक आर्थिक उलाढालीचे आणि महत्त्वाचे म्हणजे लष्करी केंद्र असलेले शहर आहे. मराठा लाईट इन्फंट्री आणि कमांडो प्रशिक्षण केंद्र आहे. बेळगाव, महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील लोक गोव्यातील नव्याने उद्घाटन झालेल्या मोपा विमानतळ, सिंधुदुर्गातील चीप्पी विमानतळ आणि रेड्डी बंदर येथे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावरून चंदगडसह आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, गोवा या भागातील नागरिकांची सातत्याने ये-जा असते.
बेळगाव येथील कृषी उत्पादने, भाजीपाला, किराणामाल आणि गोव्यातील सिमेंट व स्टील, गोवा व सिंधुदुर्ग येथील मासळी, तसेच कोकणातील हापूस आंब्याची वाहतूक याच महामार्गाने होत असते. या मार्गाचा विकास केल्यास बेळगाव, गोवा, महाराष्ट्र-कोकण या विभागातील लोकांसाठी सोयीचा होईल. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास नागरिकांचा प्रवास सोपा व अपघात कमी होतील. त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून विकसित करावा, अशा आशयाचे निवेदन नितीन गडकरी यांना देण्यात आले. निवेदन देताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, अशोक पाटील, लक्ष्मण खांडेकर, निंगाप्पा देसुरकर, टोपाण्णा पाटील, एन. वाय. चौगुले, मिथुन उसुलकर, बसवंत बेनके आदी उपस्थित होते. सदर निवेदन नितीन गडकरी यांनी स्वीकारून यासंदर्भात आपण नक्कीच हालचाली करू आणि हा महामार्ग करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी दिले.