Solapur : ऊसाला 4000 चा दर जाहीर करा ; सोलापुरात ऊस आंदोलन पेटले !
शेतकरी संघटनेचे निमजाई कारखान्यात ठिय्या आंदोलन
सोलापुर : शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली 20 नोव्हेंबर रोजी ऊसाला पहिली उचल 4000 द्या व दर जाहीर केल्याशिवाय राज्यातील साखर कारखान्यांनी उसाचे गाळप करू नये यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विविध कारखाने, पोलीस स्टेशन व तहसील कार्यालया मार्फत निवेदने पाठवली होती.
त्या निवेदनात ऊसाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या, काटा मारणाऱ्या तसेच ऊस दर जाहीर न केलेल्या व मागील ऊस बिले थकीत असलेल्या कारखान्यांवर दिनांक 23 नोव्हेंबर पासून आंदोलने करणार असल्याचे जाहीर केले होते, त्याप्रमाणे आज बार्शी तालुक्यातील निमजाई कारखान्याच्या गव्हाणीत उतरून ठिय्या मांडत कारखाना बंद करण्यात आला. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजय रनदेवे, बार्शी तालुका अध्यक्ष हनुमंत कापसे, उमेश यादव, मुसा मस्के, दत्ता कापसे, तानाजी कापसे, ज्ञानेश्वर पवार, विजय पवार, नारायण डिसले, बालाजी डिसले, किसन डिसले, दयानंद ढेंगळे, नितीन कापसे, प्रदीप पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी गायकवाड म्हणाले की, ऊस उत्पादनाचा खर्च गगनाला भिडलेला असताना कारखानदार मात्र शेतकऱ्यांचा ऊस फुकट भावात लुटत आहेत ते तात्काळ थांबवा अन्यथा वैतागलेला शेतकरी कारखाने पेटवल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी तरुण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड यांनी दिला.