गुजरात, उत्तराखंड यांचे निर्णायक विजय
वृत्तसंस्था / नाडियाद, रोहटक
रणजी क्रिकेट स्पर्धेतील क गटातील झालेल्या सामन्यात विशाल जैस्वालच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर गुजरातने सेनादलाचा 6 गड्यांनी पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात उत्तराखंडने यजमान हरियाणाचा एक डाव आणि 28 धावांनी दणदणीत पराभव करत 6 गुण वसुल केले.
सेनादलाने पहिल्या डावात 248 धावा जमविल्यानंतर गुजरातने पहिल्या डावात 256 धावा जमवित 8 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर सेनादलाचा दुसरा डाव 125 धावांत आटोपला. सेनादलाच्या दुसऱ्या डावात अहलावतने 56 धावा जमविल्या तर गुजरातच्या विशाल जैस्वालने 59 धावांत 4 तर सिद्धार्थ देसाईने 44 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर गुजरातने दुसऱ्या डावात 4 बाद 118 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला. या सामन्यात गुजरातला सहा गुण मिळाले.
रोहटकमध्ये झालेल्या सामन्यात उत्तराखंडने यजमान हरियाणाचा एक डाव आणि 28 धावांनी दणदणीत पराभव करत सहा गुण वसुल केले. या सामन्यात उत्तराखंडने पहिल्या डावात 288 धावा जमविल्या. त्यानंतर हरियाणाचा पहिला डाव 112 धावांत आटोपल्याने त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला. हरियाणाने 6 बाद 105 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 148 धावांत आटोपला. उत्तराखंडच्या सुचितने पहिल्या डावात 27 धावांत 5 तर दुसऱ्या डावात 56 धावांत 6 असे एकूण 11 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: सेना दल प. डाव 248, गुजरात प. डाव 256, सेना दल दु. डाव 125, गुजरात दु. डाव 4 बाद 118
उत्तराखंड प. डाव 288, हरियाणा प. डाव 112, हरियाणा दु. डाव 148.