मुख्यमंत्रिपदावर आज फैसला
दिल्लीत राहुल गांधी-मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात होणार चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
संसदेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेस हायकमांड राज्यातील मुख्यमंत्रिपदावर निर्णय घेणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका खासगी समारंभात सहभागी होण्यासाठी बुधवारी रात्री खर्गे दिल्लीहून बेंगळूरला आले. गुरुवारी दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यापूर्वी झाल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद अधिकार वाटप करारावर आज फैसला होण्याची शक्यता आहे.
हायकमांडचा निर्णय होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी कसरत करत असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटातील मंत्र्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. मंगळवारी रात्री बेंगळुरातील खासगी हॉटेलमध्ये शिवकुमार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कुतूहलात भर पडली आहे. दुसरीकडे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील गोंधळावर पडदा टाकण्यासाठी जलद हालचाली चालविल्या आहेत.
मागील आठवड्यात काँग्रेसमधील काही आमदारांनी नवी दिल्लीला जाऊन शिवकुमार यांच्यावतीने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. शिवकुमारांच्या समर्थक गटातील आमदार दिल्लीला गेल्यानंतर इकडे बेंगळुरात मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी काही मंत्र्यांची भोजनावळीच्या निमित्ताने बैठक झाली होती. यावेळी पक्षातील राजकारण तापलेले असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेंगळुरात येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व पक्षातील आमदारांशी चर्चा केली होती. आता येत्या गुरुवार 27 नोव्हेंबरला राहुल गांधी व खर्गे यांची बैठक होईल. यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सिद्धरामय्यांच्या मनपरिवर्तनासाठी प्रयत्न
हायकमांडच्या निर्णयाविषयी कुतूहल निर्माण झालेले असतानाच शिवकुमार यांनी मंगळवारी रात्री एका खासगी हॉटेलमध्ये मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी तासभरापेक्षा जास्त वेळ चर्चा केली. यावेळी शिवकुमारांनी अधिकार हस्तांतराबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मनपरिवर्तन करा, अशी विनंती केल्याचे समजते. पक्ष सत्तेवर आल्यानंतर हायकमांडच्या उपस्थितीत मागील चर्चेनुसार सिद्धरामय्या यांनी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुख्यमंत्रिपद सोडावे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चालवेन. मला मुख्यमंत्री होण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंतीही त्यांनी सतीश जारकीहोळी यांच्याकडे केल्याचे समजते.
जारकीहोळींना ‘ऑफर’?
सर्वांनी मिळून 2028 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणले पाहिजे. अधिकार हस्तांतर होऊन मी मुख्यमंत्री बनलो तर तुम्हाला केपीसीसीचे अध्यक्षपद मिळेल. उपमुख्यमंत्रिपदही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. सिद्धरामय्या यांचे मनपरिवर्तन करून अधिकार हस्तांतर सुलभ करण्यास सहकार्य करा, अशी ऑफर शिवकुमार यांनी मंत्री जारकीहोळींना दिल्याचे समजते. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासोबत बैठक घेण्यापूर्वी शिवकुमार यांनी मंगळवारी रात्री बेंगळुरात मंत्री जमीर अहमद खान आणि मंत्री प्रियांक खर्गे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय होण्यापूर्वी शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्या गटातील मंत्र्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
राहुल गांधींकडून शिवकुमार यांना एक ओळीचा संदेश
राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून गोंधळ सुरू असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना ‘थोडा वेळा प्रतीक्षा करा, मी तुमच्याशी संपर्क साधेन’, असा संदेश पाठविला आहे, असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीला जाऊन शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भेट शक्य न झाल्याने त्यांनी पुन्हा भेटीसाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी शिवकुमारना थोडा वेळा प्रतीक्षा करा, मीच तुमच्याशी संपर्क साधेन, असा संदेश पाठविला आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून कर्नाटकातील घडामोडींविषयी माहिती देतील. खर्गे यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल व रणदीप सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली आहे. एका खासगी समारंभात सहभागी होण्यासाठी बुधवारी रात्री खर्गे बेंगळुरात आले. गुरुवारी ते पुन्हा दिल्लीला परततील. राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्रिपद हस्तांतराचा मुद्दा निकाली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जारकीहोळेंशी 2028 च्या निवडणुकीबाबत चर्चा : शिवकुमार
मंत्री सतीश जारकीहोळी हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेस पक्षाला 2028 आणि 2029 च्या निवडणुकीत सत्तेवर आणण्याच्या रणनीतीवर त्यांच्याशी चर्चा केली आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष तर सतीश जारकीहोळी हे कार्याध्यक्ष आहेत. आम्ही एकत्र काम केले आहे. दोघेही एकाच मंत्रिमंडळात काम करत आहोत. दोघांमधील संबंध चांगले आहेत. सरकार सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली आहेत. उर्वरित काळात कोणती कामे करावीत, यावरही दोघांमध्ये चर्चा झाली आहे. या व्यतिरिक्त चर्चेत विशेष काहीही नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.