जि. पं. निवडणुकांबाबत आज निर्णयाची शक्यता
पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतीच्या 50 जागांसाठी निवडणुका घेण्याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. साऱ्यांचे लक्ष तारखांच्या घोषणांकडे लागले असून अनेकांनी आचारसंहितेची धास्ती घेतली आहे. कोणतेही अधिकार नसलेल्या जिल्हा पंचायतीच्या नव्या सदस्य निवडीसाठी निवडणुका घेण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय गोवा सरकार आज उच्च न्यायालयात जाहीर करणार आहे. या अगोदर 13 डिसेंबर रोजी निवडणुका घेण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर आठ दिवसांची मुदत मागून घेतली आणि निवडणुका 20 डिसेंबर रोजी घेण्याचे गोवा सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. या विषयाची सुनावणी उच्च न्यायालयात आज होणार आहे. मतदारसंघ राखीवतेसंदर्भात काही आक्षेप घेण्यात आल्याने प्रकरण उच्च न्यायालयात आहे. या निवडणुकीमुळे आचारसंहिता जारी केली जाणार असल्याने साऱ्यांचे लक्ष त्याकडे लागून आहे. गोव्यातील 14 पालिका वगळता इतर सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगानेही गोव्यातील मतदारयाद्यांची पडताळणी चालू असल्याने या निवडणुका मार्चमध्ये घ्या, अशी विनंती गोवा सरकारला केली होती. आज गोवा सरकार नेमका कोणता निर्णय घेते हे कळणार आहे.