महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तीन डिसेंबर....काँग्रेस छूमंतर’

05:54 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावाती प्रचार, गेहलोत यांच्यावर सडकून टीका

Advertisement

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता साऱ्यांची दृष्टी राजस्थानकडे वळली आहे. या राज्यातही मध्यप्रदेश आणि छत्तीसगड प्रमाणेच भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच प्रमुख स्पर्धा आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही जनसभांमध्ये भाषण करताना येथील काँग्रेस सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर घणाघाती टीका केली. काँग्रेसने गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार सोडून अन्य कोणतेही नाव घेण्यासारखे काम केले नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील जनतेला आता काँग्रेसचा वीट आला असून ‘तीन डिसेंबर, काँग्रेस छूमंतर’ अशी स्थिती दिसून येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भाजपला स्पष्ट बहुमताचा विश्वास व्यक्त केला.

Advertisement

काँग्रेसच्या पाच वर्षांच्या काळात राजस्थान राज्य गुन्हे आणि धार्मिक दंगली यांचे अग्रस्थान बनले आहे. काँग्रेसने विकासाशी आपले काहीही देणेघेणे ठेवलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात लोकांना होळी, रामनवमी, हनुमान जयंती किंवा इतर सण साजरे करण्यासाठी अनुकूल स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे राज्यातील जनता संतप्त झाली असून हा संताप मतदान यंत्रांमधून बाहेर पडणार आहे. 3 डिसेंबरला जेव्हा निवडणुकांचे परिणाम समोर येतील तेव्हा काँग्रेस गायब झालेली दिसेल. काँग्रेसच्या कुशासनाला लोकच प्रत्युत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी शनिवारी राज्यात भरतपूर तसेच अन्य स्थानी जनसभा घेतल्या.

मंत्र्याचे निर्लज्ज विधान

राजस्थानात गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यासंबंधी विधानसभेत सरकारला जाब विचारण्यात आला होता. त्यावेळी, काँग्रेसच्या एका मंत्र्याने, राजस्थान हा मर्द लोकांचा प्रदेश आहे, त्यामुळे बलात्कार अधिक प्रमाणात होतात, असे उत्तर दिले होते. हे उत्तर हा निर्लज्जपणाचा कळस होता. तरीही या मंत्र्याला पुन्हा एकदा यावेळी विधानसभेचे तिकिट देण्यात आले आहे. अशा उन्मत्त सरकारला घरी बसविण्याची वेळ आता आली आहे. लोक ती निश्चितच साधतील, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नेते एकत्र, दुफळी कायम...

राजस्थानात काँग्रेस मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यात विभागली गेल्याचे दिसून येत आहे. सध्या गेहलोत आणि पायलट मतभेद विसरुन एकत्र आल्याचे भासवत असले तरी कार्यकर्ता पातळीवर दुफळी कायम असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आव्हानात्मक परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. काही मतदारसंघांमध्ये या दुफळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

25 नोव्हेंबरला मतदान

राजस्थानातील विधानसभेच्या सर्व 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे अनुमान आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन प्रमुख प्रतिद्वंद्वी पक्ष आहेत. तर समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काही स्थानिक पक्षही त्यांचे भाग्य आजमावत आहेत. तथापि, आजपर्यंतच्या परंपरेनुसार आताही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच चुरस आहे. 3 डिसेंबरला मतगणना होणार आहे.

आमच्याजवळही लाल डायरी...

मध्यंतरीच्या काळात राजस्थानात ‘लाल डायरी’ प्रकरण बरेच गाजले होते. या डायरीत राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असा आरोप काँग्रेसच्याच आमदारांनी केला होता. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या भाषणात हाच धागा पकडून आमच्याजवळही अशी लाल डायरी असून निवडणुकीनंतर आमचे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला जाईल, असे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article