For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैद्यकीय क्षेत्रात डेक्कन मेडिकलची सर्वोत्तम कामगिरी

12:20 PM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
वैद्यकीय क्षेत्रात डेक्कन मेडिकलची सर्वोत्तम कामगिरी
Advertisement

आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव : डेक्कन मेडिकल सेंटरचा रौप्यमहोत्सवी सोहळा : मान्यवरांकडून हॉस्पिटलला शुभेच्छा

Advertisement

बेळगाव : वैद्यकीय पेशा ही सेवा म्हणून ओळखली जाते. परंतु सध्या काही डॉक्टर व हॉस्पिटल या पेशाचा व्यवसाय करीत आहेत. वारेमाप वैद्यकीय बिल लावून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे, असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे डॉ. दोड्डण्णवर यांच्यासारखे डॉक्टर तळागाळातील रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांचे आरोग्य सुधारत आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी काढले. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील गुड्सशेड रोड येथील डेक्कन मेडिकल सेंटरचा रौप्यमहोत्सवी सोहळा मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात आरोग्यमंत्री गुंडूराव बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, केएलईचे चेअरमन प्रभाकर कोरे, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार संजय पाटील, विधानपरिषद सदस्य नागराजू यादव, वायव्य परिवहन मंडळाचे संचालक सुनील हणमण्णावर, डेक्कन मेडिकल सेंटरचे संचालक रमेश दोड्डण्णवर, संचालिका सावित्री दोड्डण्णवर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, राज्यातील वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येक तालुक्यात चांगल्या दर्जाचे सरकारी हॉस्पिटल उभारले जात आहे. खानापूर, कित्तूर, रामदुर्ग, अथणी यासारख्या भागात नवीन हॉस्पिटल उभारण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अनेक डिजीटल सेवा दिल्या जात आहेत. सरकारी हॉस्पिटलच्या दिमतीला खासगी हॉस्पिटल उत्तम सेवा देत आहेत. परंतु या क्षेत्राचे कॉर्पोरेट क्षेत्र होऊ देऊ नका. रुग्ण उत्तम वैद्यकीय सेवेमुळे हॉस्पिटलमध्ये येत असतो. त्याच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घ्या, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या. प्रकाश हुक्केरी यांनी चिकोडी विभागातील वैद्यकीय रिक्त पदे भरण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली. डॉ. प्रभाकर कोरे यांनी दोड्डण्णवर यांच्या कार्याचे कौतुक केले. संचालक राज दोड्डण्णवर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन स्वाती जोग यांनी केले. श्लोक दोड्डण्णवर यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.