रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 11 वर
20 हून अधिक जखमी : काहींची प्रकृती चिंताजनक
वृत्तसंस्था/ विलासपूर
छत्तीसगडमधील विलासपूर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात बुधवारपर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारपर्यंत हा आकडा 6 होता. अजूनही 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बहुतेक मृत विलासपूरचे रहिवासी असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, अपघातग्रस्त रेल्वेंचे डबे बाजूला काढून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
गेवरा रोड विलासपूर मेमू लोकल ट्रेन मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास विलासपूर आणि गौतोरा स्टेशन दरम्यान कोरबा मार्गावर लाल खंडजवळ चालत्या मालगाडीला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की मेमू ट्रेनचे इंजिन मालगाडीवर चढले होते. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपये आणि जखमींना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत केली जाईल.
रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मालगाडी आणि मेमू लोकल ट्रेन गेवरा रोडवरून विलासपूरला येत होत्या. विलासपूर रेल्वेस्थानकापासून सुमारे 12 किमी अंतरावर असलेल्या लालखंडजवळ दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यामुळे लोकल मेमूचे इंजिन मालगाडीच्या शेवटच्या डब्यावर आदळले होते. यात अनेक डब्यांचे नुकसान झाले. या अपघातात ओव्हरहेड वायर आणि सिग्नल सिस्टीमचे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीला वेळ लागू शकतो.