For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोटमधील मृतांचा आकडा 28 वर

06:22 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजकोटमधील मृतांचा आकडा 28 वर
Advertisement

गेम झोनमध्ये आग दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाने मागवला अहवाल,

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत 28 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी 28 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये 12 मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, या गेमिंग झोनमध्ये बऱ्याच बाबी गैर असल्याचे तपासात आढळून आले असून पोलिसांनी संबंधितांची धरपकड सुरू केली आहे. तसेच उच्च न्यायालयानेही या घटनेची गंभीर दखल घेत अहवाल मागवला असून सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे.

Advertisement

टीआरपी गेम झोनमधील दुर्घटनेप्रकरणी मालक युवराज सिंग सोलंकी, भागीदार प्रकाश जैन, राहुल राठोड आणि व्यवस्थापक नितीन जैन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर चौघांनीही आपले फोन बंद केले होते. गेम झोन आगीच्या घटनेबाबत एसआयटीने रविवारी पहाटे स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनीही शनिवारी रात्री उशिरा राजकोटला पोहोचून बैठकीला हजेरी लावली. मृतांची ओळख पटवण्यासाठी मृतदेह आणि मृतांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्यात आल्याचे टीमने सांगितले.

आग नेमकी कशी लागली

तीन मजली गेम झोन 2020 मध्ये भाड्याच्या 2 एकर जागेवर बांधला गेला. त्याची रचना लाकडी आणि टिनच्या शेडवर उभी होती. अनेक ठिकाणी दुऊस्ती व नूतनीकरणाचे कामही सुरू होते. एका ठिकाणी, जिन्यावर वेल्डिंग करताना निघणाऱ्या ठिणग्यांमुळे स्फोट झाला आणि जवळच आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आग काही मिनिटांत खालपासून वरपर्यंत पसरली होती. तीन मजली इमारतीत खालून वर जाण्यासाठी एकच जिना होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील लोकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

...अन् उडाला भडका

गेम झोनचा घुमट कापड आणि फायबरचा होता. ही रचना लाकूड, टिन आणि थर्माकोलच्या पत्र्यांपासून बनवण्यात आली होती. आतील जमिनीवरही रबर आणि थर्माकोलच्या सतरंज्या अंथरल्या होत्या. याशिवाय 2 हजार लिटर डिझेल आणि 1,500 लीटर पेट्रोलही गेज झोनमध्ये साठले होते. त्यामुळे आग काही मिनिटांतच वेगाने पसरली. या भडक्यात मृतदेह इतके जळाले आहेत की ओळख पटवणे कठीण आहे. डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवावी लागली आहे.

उच्च न्यायालयाने मागितला अहवाल

गेम झोनला लागलेल्या आगीत 28 जण जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश बीरेन वैष्णव आणि देवेन देसाई यांनी राज्यातील 4 मोठ्या शहरांतील अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या सर्व गेम झोनचा तपशील मागवला आहे. न्यायालयाने चार महानगरांच्या महापालिकांना 24 तासांत ही माहिती देण्यास सांगितले आहे. या घटनेवर न्यायालय स्वत: सुनावणी करत आहे. या सुनावणीदरम्यान या घटनेशी संबंधित वृत्तपत्रातील अनेक कटिंग्ज न्यायाधीशांसमोर मांडल्याचे समजते. याशिवाय टीआरबी गेम झोनशी संबंधित अनेक माहितीही न्यायालयाला देण्यात आली आहे.

लुकआउट नोटीस जारी

सदर गेमिंग झोनला नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत परवाना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही येथे सर्व उपक्रम राजरोजपणे सुरू होते, असे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अपघाताच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच आरोपींना परदेशात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टीआरपी गेम झोनच्या मालकांपैकी एक युवराज सिंग सोलंकी याला राजकोट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर मालकांच्या घराची चौकशी करून झडती घेतली जात आहे. गेम झोनचे व्यवस्थापक नितीन जैन हेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कलावद रोडवर असलेल्या या गेम झोनमध्ये वीकेंड असल्याने 500 ऊपयांचे तिकीट 99 ऊपयांना दिले जात असल्याने गर्दी अधिक होती. याचदरम्यान आगीचा भडका उडाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 पथकांना सुमारे 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. 25 हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली. गेम झोनमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर जाण्याचा एकच मार्ग होता. टीआरपी गेम झोनकडे फायर एनओसीही नव्हती, असे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.