कारागृहातील मृत्यू-आत्महत्या प्रकरणे चिंताजनक
कर्नाटकात गेल्या दहा वर्षांत 769 कैद्यांचा मृत्यू : हिंडलगा कारागृह दुसऱ्या क्रमांकावर, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई
बेळगाव : बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील कारागृहात कैद्यांची मृत्यू प्रकरणे वाढती आहेत. आत्महत्या, आजारपणाने मृत्यू व इतर कारणांमुळे गेल्या दहा वर्षांत कर्नाटकातील वेगवेगळ्या कारागृहात 769 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 79 कैद्यांचा मृत्यू कसा झाला, याचा आजवर उलगडा झाला नाही. कारागृह विभागाकडून मिळालेली आकडेवारी थक्क करणारी आहे. अतिसुरक्षित अशा कारागृहात 90 जणांनी आत्महत्या केली आहे. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्यांची आत्महत्या, अनैसर्गिक मृत्यू प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून कारागृह विभागाचे 111 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या गुन्ह्यासाठी कारावास भोगणाऱ्या कैद्यांमध्ये अनेक वेळा आत्महत्येचा विचार येतो. कोणी बेडशीट, चादरी व पँट कापून आत्महत्या केली आहे. तर आणखी कोणी कारागृहातील स्वयंपाक घरातील सुरी व इतर अवजाराने नस कापून घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार अशा प्रकरणात शवचिकित्सेची प्रक्रिया केली जाते.
जवळपास एक हजार कैद्यांना स्थानबद्धतेत ठेवण्याची क्षमता असलेल्या हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात यापूर्वी खुनाचे प्रकारही घडले आहेत. कारागृहात सुपारी घेऊन एका कैद्याचा खून करण्यात आला होता. कारागृह अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपले होते. उंचावरून पडून मृत्यू झाल्याचे सांगत त्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या तज्ञांनी शवचिकित्सेचा व्हिडिओ पाहून त्याचा उंचावरून पडून नाही तर कोणी तरी डोक्यावर हल्ला केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला व या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना गृहखात्याला केली होती. सीआयडी चौकशीत या कैद्याचा सुपारी घेऊन खून केल्याचे उघडकीस आले होते. आधीच कारागृहात असलेल्या मुनवळ्ळी येथील एका पैलवानाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा खून केला होता. नंतरच्या काळात कारागृह अधिकाऱ्यांनाही अटक झाली. अशी अनेक प्रकरणे हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात घडली आहेत. नसती कटकट नको म्हणून कारागृहातील अधिकारी प्रकरण दडपण्यातच धन्यता मानतात. पण अनेक वेळा असे प्रकार अंगलट आलेले आहेत.
कैद्याने खंडणीसाठी धमकावल्याचाही प्रकार
आणखी एका कैद्याच्या मृत्यू प्रकरणीही मानव हक्क आयोगाने कारागृह अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. अलीकडच्या काही वर्षांत तर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील अंतर्गत संघर्ष, हाणामारी, एकमेकांवरील कुरघोड्या, अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्याचे प्रकार वाढले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून याच कारागृहातील एका कैद्याने खंडणीसाठी धमकावल्याचाही प्रकार घडला आहे. वर्षानुवर्षे कारावासात राहून कैद्यांच्या मन:स्थितीवर त्याचा परिणाम होतो. अनेकांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो. या परिस्थितीत बदल करण्यासाठी कारागृह विभागाकडून सातत्याने कार्यक्रम राबविले जातात. योग, ध्यान, मानसोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन सुरूच असते. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अनेक कैद्यांनी कारागृहात राहून उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. तर काही जण मानसिक अस्वास्थ्यातून एकतर कारागृहातून फरारी होण्याची योजना तयार करतात तर आणखी काही जण आत्महत्या करण्याचा विचार करतात. अशा विचारातूनच अनेकांनी कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून पलायन केल्याचीही उदाहरणे आहेत. कारागृहाच्या चार भिंतीआड घडणाऱ्या घटना बाहेरच्या जगाला कळत नाहीत. याचाच फायदा अनेक वेळा तेथील अधिकारी घेतात. प्रत्येक वेळा अशी प्रकरणे दडपण्यात ते यशस्वी होतातच असे नाही.
व्यापक प्रयत्न होण्याची गरज
गेल्या दहा वर्षांत पोलिसांच्या ताब्यात असताना राज्यात 367 जणांचा मृत्यू झाला आहे. हुबळी-धारवाडमध्ये 59, बेळगावमध्ये 53, म्हैसूरमध्ये 50, गुलबर्गा येथे 45, मंगळूर येथे 24 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मिळाली आहे. नैसर्गिक मृत्यू झालेल्या कैद्यांच्या वारसदारांना गृह खात्याकडून 1 कोटी 40 लाख रुपये तर कारागृह विभागाकडून 2 कोटी 94 लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे. कारागृहातील मृत्यूंचे प्रमाण घटविण्यासाठी व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे.