अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा
जिल्हा पोक्सो न्यायालयाचा निकाल : अत्याचारानंतर मुलीला फेकले विहिरीत
बेळगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर कंबरेला दगड बांधून विहिरीत फेकून देऊन तिचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा पोक्सो न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भरतेश रावसाब मिरजी (वय 28) रा. परमानंदवाडी ता. रायबाग असे आरोपीचे नाव असून शुक्रवार दि. 26 रोजी न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला फाशीची शिक्षा होणारी राज्यातील व विशेषकरून जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. अल्पवयीन मुलगी 15 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान घराजवळील एका मंदिराजवळ असलेल्या किराणी दुकानाला चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. चॉकलेट घेऊन ती पुन्हा आपल्या घराकडे पायी चालत येत होती. त्यावेळी आरोपीने मुलीला आपल्या घरात नेले व त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपी भरतेश याने घरातील आपल्या आईची साडी मुलीच्या कंबरेला बांधली. साडीला 20 किलोचा दगड बांधून घरानजीक असलेल्या विहिरीत तिला फेकून देऊन खून केला.
पीडितीचे कुटुंबीय सायंकाळी शेतावरून घरी परतल्यानंतर घरात मुलगी नसल्याचे दिसून आल्यानंतर पालकांची घाबरगुंडी उडाली. एकुलती एक मुलगी घरात नसल्याने पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कोठे खेळत आहे का? या संशयावरून तिचा शोध चालविण्यात आला. त्यानंतर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या दुकानात जाऊन चौकशी केली असता ती चॉकलेट घेऊन गेल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर गावात विविध ठिकाणी चौकशी करून शोध घेण्यात आला. शेती परिसरातही पाहणी करण्यात आली. तरीही कोठेच तिचा थांगपत्ता न लागल्याने शेवटी कुटुंबीयांनी कुडची पोलीस स्थानकात मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार यांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला. अपहरण झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकातील कर्मचारी मल्लिकार्जुन यमगार आणि आर. बी. गौडर हे दोघेजण पूजा नावाचे श्वान घेऊन गावात दाखल झाले. श्वानाला पीडितेच्या कपड्यांचा वास दाखवून शोधकार्य सुरू केले. ज्या मार्गावरून मुलगी गेली होती त्या मार्गावरून श्वान पुढे गेले व आरोपीच्या घराजवळ जाऊन घुटमळले. तेथून श्वान पुन्हा विहिरीजवळ जाऊन थांबले. तेथून श्वान पुढे न गेल्याने पोलिसांना संशय आला. त्याचबरोबर ज्या घराजवळ श्वान घुटमळले होते, त्या घरालाही कुलूप घालण्यात आला होता.
पोलिसांनी कूपनलिका दुरुस्ती कामासाठी वापरले जाणारे कॅमेरे विहिरीत सोडून पाहणी केली. त्यावेळी विहिरीत मुलीच्या हाताची बोटे दिसून आली. मृतदेह विहिरीत असल्याची खात्री झाल्यानंतर सहा विद्युत मोटर लावून रात्रभर पाण्याचा उपसा करण्यात आला. विहिरीतील पाणी काढल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान विहिरीत उतरले. त्यावेळी मुलीच्या कंबरेला 20 किलोचा दगड बांधून तिला फेकून दिल्याचे दिसून आले. साडीला बांधलेला दगड काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भरतेश याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपास अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शवचिकित्सेसाठी मृतदेह शवागृहाला पाठविला. त्याठिकाणी डॉ. के. एस. गुरुदत्त यांनी उत्तरीय तपासणी केली. शवचिकित्सा अहवाल न्यायालयाला पाठविण्यात आला. तत्कालीन तपास अधिकारी एन. महेश आणि के. एस. हट्टी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्या ठिकाणी सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे 20 साक्षीदार, 106 कागदोपत्री पुरावे, 22 मुद्देमाल तपासण्यात आले. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 363 नुसार 7 वर्षांची शिक्षा, 5 हजार रुपयाचा दंड, कलम 76 नुसार 10 वर्षांची शिक्षा, 15 हजार रुपयांचा दंड, कलम 201 साक्ष नाश करणे कलमाखाली 7 वर्षांची शिक्षा व 5 हजार रुपयांचा दंड आणि पोक्सो कलम 4 आणि 6 नुसार जन्मठेप व 20 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास 1 वर्षाची वाढीव शिक्षा सुनावली. तसेच मयत मुलीच्या आई-वडिलांना जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 10 लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने बजावला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
डॉक्टरांची साक्षी ठरली महत्त्वाची
मुलीचे शवविच्छेदन केलेले डॉक्टर के. एस. गुरुदत्त यांनी न्यायालयात दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. मुलीच्या स्नायूंच्या आतील भागात, त्याचबरोबर मेंदूतही रक्तस्त्राव होत होता. तिची दोन्ही फुफ्फुसे सुजलेली होती आणि जेव्हा ते कापले गेले तेव्हा रक्तात मिसळलेला फेस बाहेर आला. त्याचबरोबर पोट आणि रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. रासायनिक चाचण्याही करण्यात आल्या. त्यानंतर पोस्ट मार्टेम रिपोर्ट आला. मुलीचा मृत्यू मानेवर दाबाने झालेल्या जखमांमुळे आणि बुडून झाला असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले.
राज्यातील दुसरी घटना
जिल्हा पोक्सो न्यायालयाकडून पोक्सो प्रकरणात आरोपींना जन्मठेप व इतर प्रकारच्या शिक्षा सुनावल्या जात आहेत. मात्र पोक्सो प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा होणारी राज्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी बेळगाव पोक्सो न्यायालयानेच हारुगेरी येथील एका प्रकरणात पहिल्यांदा आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. एकंदरीत राज्यात बेळगाव जिल्ह्यातच दोन प्रकरणांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे.
-अॅड. एल. व्ही. पाटील, सरकारी वकील