कृष्णेत बुडालेल्या तिघा जुगाऱ्यांचा मृत्यू
दोघांचा शोध सुरू : तिघे बचावले : विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी बॅकवॉटर परिसरातील दुर्घटना
वार्ताहर /विजापूर
जुगार खेळताना पडलेल्या धाडीत पोलिसांपासून वाचण्यासाठी तराफ्यात बसून कृष्णा नदीतून जात असताना तराफा उलटून आठ जण पाण्यात पडले होते. त्यातील तिघे बचावले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघे जण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यात घडली. अल्लमट्टी जलाशयाच्या कोल्हाराजवळ कृष्णा नदीच्या बॅकवॉटर परिसरात ही दुर्घटना घडली. पुंडलिक मल्लाप्पा यंकंची (वय 36, रा. कोलार), दशरथ गौडर (वय 58 रा. कोलार), तय्युम चौधरी (वय 45) अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. मेहबूब वालिकर (वय 35) व रफिक बाँबे (वय 40) हे अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख ऋषीकेश सोनवणे यांनी दिली आहे. घटनास्थळी बसवन बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील यांनी भेट दिली.
विजापूर जिल्ह्याच्या कोल्हार तालुक्यातील बलुती गावाबाहेर कृष्णा नदीच्या काठावर मंगळवारी आठ जण जुगार खेळत बसले हेते. दरम्यान, पोलिसांनी अचानक धाड टाकल्याचे समाजताच आठ जणांनी तराफ्याचा वापर करत कृष्णा नदीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहात तराफा कृष्णा नदीत मध्यभागी उलटला. यावेळी पाच जण वाहून गेले तर तिघे जण बचावले आहेत. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. मात्र, पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे आल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी अग्निशमन दलाने पुन्हा शोधकार्य सुरू केले. यावेळी जवानांनी तिघांचे मृतदेह पात्राबाहेर काढले. तर उर्वरित दोघांचा शोध सुरू होता. तराफ्यातील आठ जणांपैकी सचिन कटबार हा किनाऱ्यावर पोहत आला. तर फारुख फत्तेमहम्मद याला स्थानिकांनी वाचविले आहे. तसेच बशीर होनवाड हा बुधवारी सकाळी घरी परतला. कलबुर्गी येथील एसडीआरएफ दलाच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. एसपी ऋषिकेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.