भुतरामहट्टी येथील ‘शौर्य’ वाघाचा मृत्यू
प्राणीसंग्रहालयाची माहिती : 21 दिवसांपासून होता आजारी
बेळगाव : भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात गेल्या 21 दिवसांपासून आजारी असलेल्या ‘शौर्य’ वाघाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे आता तीनपैकी दोन वाघ (कृष्णा आणि कनिष्का) राहिले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या वाघावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र सर्व ते प्रयत्न करूनही वाघाला वाचविण्यात अपयश आले. रविवारी सकाळी शौर्य वाघाने अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमींतून हळहळ व्यक्त होत आहे. संग्रहालयात कृष्णा, कनिष्का आणि शौर्य नावाचे वाघ होते. यापैकी आता साधारण 12 ते 13 वर्षांचा असलेल्या शौर्य वाघाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता केवळ कृष्णा आणि कनिष्का या दोन वाघांचे दर्शन होणार आहे. भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधून याठिकाणी वन्यप्राणी आणण्यात आले होते. त्यामध्ये सिंह, वाघ, अस्वल, बिबटे, मगर, कोल्हे, हरीण, सांबर आदींचा समावेश आहे. मात्र यापैकी एक नर जातीचा वाघ आजाराने मृत्युमुखी पडला आहे. भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सद्यस्थितीत शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र अशा स्थितीतच वाघाचा मृत्यू झाल्याने पर्यटकांतूनही हळहळ व्यक्त होत आहे.
वन्यप्राण्यांची सुरक्षितता-देखभालीबाबत प्रश्नचिन्ह
गतवर्षी प्राणीसंग्रहालयातील एका सिंहाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षितता आणि देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. म्हैसूर येथील प्राणीसंग्रहालयातून हे प्राणी आणण्यात आले होते.