For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तपासात नाही गती ; गूढ खुनांनी गुंग मती!

11:49 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
तपासात नाही गती   गूढ खुनांनी गुंग मती
Advertisement

गूढ खुनांच्या मालिकेने पोलीस दलासमोर मोठे आव्हान : नातेवाईकांची उद्विग्नता : मारेकऱ्यांना मोकळीकता

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या पूर्वभागात सुरू असलेल्या गूढ खुनांनी बेळगावकर हादरले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून झालेल्या अनेक खुनांचा तपास लागला नाही. एकापाठोपाठ एक खुनाचे सत्र सुरूच आहे. गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. सांबरा विमानतळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या होनिहाळजवळील शेतवडीत सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. निंगनगौडा शिवनगौडा सनगौडर (वय 27) मूळचा राहणार आलदकट्टी, ता. सौंदत्ती, सध्या रा. श्रीनगर असे त्याचे नाव आहे. सोमवारी निंगनगौडाच्या खुनाला आठ दिवस पूर्ण होतात. तरीही या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नाही, अशी स्थिती आहे.

व्यवसायाने कारचालक असणारा निंगनगौडा रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी कारमधून सौंदत्तीला गेला होता. सौंदत्तीहून बेळगावला परतताना तो यरगट्टीजवळ उतरला. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या उज्जीनकोप्पला तो पोहोचला. आपले मित्र व नातेवाईकांना भेटून रात्री यरगट्टीला आला. एका वाईन शॉपमध्ये पार्टी करून बेळगावला येताना रात्री मोदगाजवळ त्याला बसमधून उतरविण्यात आले होते. त्यानंतर त्याचा खून झाला आहे. निंगनगौडाजवळ आयफोन होता. खुनानंतर मारेकऱ्यांनी त्याचा आयफोन पळविल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास निंगनगौडाच्या आईने त्याच्याशी संपर्क साधला. थोड्या वेळात घरी पोहोचणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, तो घरी पोहोचला नाही. दुसऱ्या दिवशी सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी होनिहाळजवळील शेतवडीत खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

Advertisement

काही जुन्या प्रकरणांना उजाळा

या खुनानंतर काही जुन्या प्रकरणांना उजाळा मिळाला आहे. खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31) मूळचा रा. उदगीर, जि. लातूर या युवकाचा दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कबलापूरजवळ खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. निशिकांतच्या खुनाला चार वर्षे उलटली तरी मारेकरी कोण? कोणत्या कारणासाठी या युवकाचा बळी घेण्यात आला? याचा उलगडा झाला नाही.

शिरविरहीत मृतदेह कोणाचा? याचाही उलगडा नाही

निशिकांतच्या खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी सध्या थांबवला आहे. न्यायालयात सी रिपोर्टही सादर करण्यात आला आहे. या घटनेनंतर 5 जुलै 2022 रोजी मुतगा येथील शेतवडीतील विहिरीत शिरविरहीत मृतदेह आढळून आला होता. शिर धडावेगळे करून सुमारे 30 वर्षीय युवकाचा मृतदेह माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या विहिरीत टाकून देण्यात आला होता. या प्रकरणाचीही मारिहाळ पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. खुनाचा तपास तर दूरच शिरविरहीत मृतदेह कोणाचा आहे? याचाही उलगडा झाला नाही.

गूढ खुनांची मालिकाच सुरू

बेळगाव पूर्वभागात गेल्या काही वर्षांत गूढ खुनांची मालिकाच सुरू आहे. अनेक प्रकरणांचा तपास रखडला आहे. एक-दोन वर्षात तपास लागला नाही तर पोलीस न्यायालयात सी रिपोर्ट दाखल करतात. एखाद्या प्रकरणात सी रिपोर्ट सादर केल्यानंतरही जर धागेदोरे सापडले तर तशा प्रकरणांचा तपास पुन्हा हाती घेता येतो. अनेक प्रकरणात सी रिपोर्ट दाखल झालेले आहेत. निशिकांत दहीकांबळे या युवकाचे कुटुंबीय उदगीरला असतात. अनेकवेळा आपल्या मुलाचे मारेकरी कोण? हे जाणून घेण्यासाठी ते बेळगावला आले होते. मात्र, चार वर्षांनंतरही त्यांना याची माहिती मिळाली नाही. निशिकांतचे वडील सुभाषराव दहीकांबळे यांनी तर आपल्या मुलाचे खून प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही. मारिहाळ पोलिसांनाही या प्रकरणाचा छडा लावता आला नाही.

सोनट्टी येथील रखवालदाराच्या खुनाचा अद्याप तपास नाही

काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सोनट्टी येथील एका फार्महाऊसवर 28 ऑक्टोबर 2020 रोजी एका रखवालदाराचा खून करण्यात आला होता. लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45) याचा खून झाला होता. लक्ष्मण मूळचा बैलहोंगल तालुक्यातील हन्नीकेरीचा. सोनट्टी येथील एका फार्महाऊसवर तो रखवालदार होता. चार वर्षांनंतरही लक्ष्मणच्या खुनाचा तपास लागला नाही. केवळ पूर्व आणि उत्तर भागच नव्हे तर बेळगाव शहरात घडलेल्या अनेक खुनांचे गूढ उकलण्यात पोलीस दलाला यश आले नाही.

पोलिसांसमोर आव्हान

गेल्या आठवड्यात झालेल्या निंगनगौडा सनगौडर या तरुणाच्या खुनाचा तरी तपास लागणार का की याआधीच्या खून प्रकरणांप्रमाणेच या खुनाचेही गूढ गूढच राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या खुनाच्या घटनेनंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याचा छडा लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मारेकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होते. सुरुवातीलाच दिरंगाई झाली, दुर्लक्षपणा झाला तर नंतरच्या काळात त्या प्रकरणांचे गूढ गूढच राहते. विद्यानगर-अनगोळ येथील गगन नरेश सोमनाचे (वय 8) या बालकाच्या खुनाला चौदा वर्षे लोटली तरी गगनचे मारेकरी कोण? याचा तपास लागला नाही. आता बेळगाव पूर्वविभागातील गूढ खुनांच्या मालिकेने तर पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Advertisement
Tags :

.