न्यायालयाकडून मुदत, पण जप्तीची टांगती तलवार कायम
मनपाच्या अर्जावर न्यायालयाकडून 27 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
बेळगाव : शहापूर येथील ‘त्या’ जागेच्या प्रकरणामध्ये महानगरपालिकेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये मुदतीसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी पक्षकाराच्या वकिलांनी विरोध केला. मात्र न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत महानगरपालिकेला मुदत दिली आहे. परिणामी न्यायालयाने मुदत वाढवून दिली असली तरी मनपावर जप्तीची टांगती तलवार कायम आहे. मंगळवारी न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले होते. त्यामुळे न्यायालयीन कर्मचारी जप्ती करण्यासाठी गेले असता त्याला विरोध करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी तारीख असल्याने त्या ठिकाणी म्हणणे मांडू, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मनपाने बुधवारी मुदतीसाठी अर्ज दाखल केला. शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानाच्या बाजूला असलेल्या हुलबत्ते कॉलनीमधील रस्त्यासाठी 5 गुंठे जागा घेतल्यानंतर संबंधित मालकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी 75 लाख 96 हजार 420 रुपये देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला होता.
गेली 36 वर्षे जागेचे मालक नेमाणी भैरु जांगळे, बाबु उर्फ बाबुराव भैरु जांगळे, आनंदीबाई रामचंद्र जांगळे, जिजाबाई रामचंद्र जांगळे हे न्यायालयीन लढा लढत आहेत. न्यायालयाने अनेकवेळा जागा देण्याबाबत आदेश देवूनही महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी येथील दुसरे अतिरिक्ति उच्च दिवाणी न्यायालयाचा आदेशाची अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने थेट जप्तीचा आदेश बजावला आहे. तत्पूर्वी महानगरपालिकेने स्थगिती मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्या अर्जावर सुनावणीच झाली नाही. परिणामी मंगळवारी जप्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी गेले असता त्याला विरोध झाला आहे. बुधवारी महानगरपालिकेचे कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी आणि त्यांच्या सहकारी वकील रमेश मोरब यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होवून 27 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.