‘एचएसआरपी’साठी 12 जूनपर्यंत मुदत
राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बसवण्यासाठी मे अखेरपर्यंत मुदत दिली होती. आता ही मुदत 12 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयाला माहिती दिली असून 12 जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनचालकांवर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य करण्याबाबत एचएसआरपी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि इतरांनी दाखल केलेल्या अपीलांवरील सुनावणावेळी न्यायमूर्ती एस. आर. कृष्णकुमार आणि न्यायमूर्ती रामचंद्र डी. हुद्दार यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारने ही माहिती दिली. नंबर प्लेट उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या बीएनडी एनर्जी लिमिटेडने नंबरप्लेट बसवण्यासाठी 31 मेपर्यंत असणारी मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा अंतरिम अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान खंडपीठाने ही मुदत संपल्याने काय परिणाम होईल, असा सवाल केला असता, 12 जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानंतर खंडपीठाने पुढील सुनावणी 11 जूनपर्यंत लांबणीवर टाकली.