रासायनिक पाण्यामुळे वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच; नागरिकांतून हळहळ, जिवीतास धोका, नदीपात्राच्या परिसरात दुर्गंधी
वारणानगर / प्रतिनिधी
वारणा नदीत रासायनिक मिश्रीत पाणी मिसळल्याने नदीतील लाखो मासे मृत पावले असून कोडोली - चिकुर्डे (ता. पन्हाळा) धरणाजवळ व काठावर या मृत माशाचा खच पडला आहे. नदीतील दूषीत पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या जिवीतास धोकाही निर्माण झाला आहे.
वारणा नदीत पाण्याची पातळी कमी अधिक होत आहे याचा फायदा उठवत या नदीपात्रात उद्योगातील कारखान्यातून रासायनिक पाणी सोडल्याने या पात्रातील पाणी दूषीत होऊन लाखो मासे मृत झाले आहेत सोमवार दि. 25 रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास कोडोली धरण व नदीपत्राच्या बाजूला सर्वत्र पाच हजारापेक्षा अधिक मोठ्या माशाचा तर लहान मृत माशाचा हजारोच्या संखेने खच पडलेला आहे याशिवाय नदीकाठच्या दोन्ही तिरावरील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारणा नदीवरून पाणी पुरवठा होतो या गावातील नागरिकांनी पाणी उकळून थंड झाल्यावर पिण्यासाठी वापरावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले आहे.
वारणा नदी पात्रातील दूषीत पाण्यासंदर्भात जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यानी गतवर्षी दि.3 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदूषन महामंडळाकडे निवेदन देवून तक्रार दाखल केल्यावर प्रदूषन मंडळाच्या क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, अर्जुन जाधव यानी वारणा काठावर तसेच चिकुर्डे - कोडोली ता. पन्हाळा येथील धरणावर भेट देऊन पंचनामा केला परंतु यासंदर्भात कोणावर कारवाई केली किंवा नाही हे आजअखेर महामंडळाने जाहिर केलेले नाही.