डी झॉर्झी, स्टब्स यांची पहिली कसोटी शतके
द.आफ्रिकेचे बांगलादेशवर वर्चस्व, 2 बाद 307 धावा
वृत्तसंस्था/ चत्तोग्राम, बांगलादेश
सलामीवीर टोनी डी झॉर्झी व ट्रिस्टन स्टब्स यांनी पहिली शतके नोंदवल्याने दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या व शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमानांवर वर्चस्व गाजविले. दिवसअखेर द.आफ्रिकेने पहिल्या डावात 81 षटकांत 9 बाद 307 जमविल्या. डी झॉर्झी 141 व डेव्हिड बेडिंगहॅम 18 धावांवर खेळत होते. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला.
स्टब्सने 198 चेंडूत 106 धावांची खेळी करताना 6 चौकार व 3 षटकार मारले. स्टब्सला तैजुल इस्लामने बाद केले. हंगामी कर्णधार एडन मारक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्याने व झॉर्झीने पहिल्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. तैजुलने ही जोडी फोडताना मारक्रमला 33 धावांवर बाद केले. त्याने 52 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार मारले. झॉर्झी 6 धावांवर असताना पदार्पणवीर महिदुल इस्लामने त्याचा सोपा झेल सोडला. याचा लाभ घेत झॉर्झीने शतकी खेळी केली.
पहिल्या कसोटीत आठ बळी टिपणारा तैजुल इस्लाम या डावात फारसा परिणामकारक ठरला नाही. झॉर्झीने त्याच्यावर आक्रमण करीत बरेच दडपण आणले. स्टब्सही सहजतेने खेळत होता. स्पिनर्सविरुद्ध त्याने पदलालित्याचा प्रभावी उपयोग केला. झॉर्झीने पहिले कसोटी शतक 146 चेंडूत आफस्पिनर मेहिदी हसनला स्वीपचा चौकार मारत पूर्ण केले. स्टब्सने मेहिदीला तीन षटकार ठोकले तर मोमिनुल हकला स्वीपर कव्हरकडे फटका मारून एक धाव घेत शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर मात्र तैजुलने त्याला बाद केले. स्टब्स व झॉर्झी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 201 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या गोलंदाजांना झॉर्झीचा बचाव मात्र भेदता आला नाही. त्याने 211 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार, 3 षटकार मारले आहेत. त्याने बेडिंगहॅमसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 37 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प.डाव 81 षटकांत 2 बाद 307 : मारक्रम 33 (55 चेंडूत 2 चौकार), टोनी डी झॉर्झी खेळत आहे 141 (211 चेंडूत 10 चौकार, 3 षटकार), ट्रिस्टन स्टब्स 106 (198 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), बेडिंगहॅम खेळत आहे 18 (25 चेंडूत 2 षटकार), अवांतर 9, तैजुल इस्लाम 2-110