डी कॉकच्या शतकाने द. आफ्रिकेचा विजय
पाकचा 8 गड्यांनी पराभव, बर्गरचे चार बळी, मालिकेत बरोबरी
वृत्तसंस्था / फैसलाबाद
क्विंटॉन डी कॉकच्या शानदार शतकाच्या जोरावर द. आफ्रिका संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान पाकचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करुन 1-1 अशी बरोबरी साधली आहे. द. आफ्रिकेच्या डी कॉकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील पहिला सामना पाकने जिंकून आघाडी मिळविली होती. या दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकने 50 षटकात 9 बाद 269 धावा जमवित द. आफ्रिकेला विजयासाठी निर्णायक 270 धावांचे आव्हान दिले. पण डी कॉक आणि प्रेटोरियस तसेच झोर्झी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने 40.1 षटकात 2 बाद 270 धावा जमवित हा सामना 59 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी जिंकला.
पाकच्या डावामध्ये सलमान आगा आणि सईम आयुब यांनी तसेच मोहम्मद नवाज यांनी अर्धशतके झळकविली. सईम आयुबने 66 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 53, सलमान आगाने 106 चेंडूत 5 चौकारांसह 69 आणि मोहम्मद नवाजने 59 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 59, अशरफने 18 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28, मोहम्मद वासीमने 9 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. द. आफ्रिकेतर्फे पीटरने 55 धावांत 3 तर बर्गरने 46 धावांत 4 तर बॉश्चने 2 गडी बाद केले. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात 41 धावा जमविताना 3 गडी गमविले. आयुबने अर्धशतक 61 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह तर सलमान आगाने आपले अर्धशतक 82 चेंडूत 3 चौकारांसह झळकविले. सईम आयुबने आपले अर्धशतक 61 चेंडूत 1 षकटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नोंदविले. द. आफ्रिकेतर्फे बर्गरने 46 धावांत 4, एन. पीटरने 55 धावांत 3 तर बॉशचने 58 धावांत 2 गडी बाद केले. पाकने शेवटच्या 10 षटकात 90 धावा जमविल्याने त्यांना 269 धावांपर्यंत मजल मारता आली. पीटरच्या शेवटच्या षटकात पाकच्या फलंदाजांनी 22 धावा झोडपल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावाला प्रेटोरिस आणि डी कॉक यांनी दमदार सुरूवात करुन देताना 11.5 षटकात 81 धावांची भागिदारी केली. प्रेटोरियसने 40 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 46 धावा जमविल्या. डी कॉक आणि झोर्झी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 143 धावांची शतकी भागिदारी केली. झोर्झीने 63 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 75 धावा झळकविल्या. तो बाद झाल्यानंतर डीकॉक आणि कर्णधार ब्रिझेकी यांनी 40.1 षटकात संघाला विजय मिळवून दिला. द. आफ्रिकेने 2 बाद 270 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला. झोर्झीने 63 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 76 धावा झोडपल्या. कर्णधार ब्रिझेकीने 1 चौकारांसह नाबाद 17 धावा तर डी कॉकने 119 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 123 धावा झळकविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 11 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद वासीम आणि अशरफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. डी कॉकचे वनडे क्रिकेटमधील हे 22 वे शतक आहे.
संक्षिप्त धावफलक: पाक 50 षटकात 9 बाद 269 (सईम आयुब 53, सलमान आगा 69, मोहम्मद नवाज 59, अशरफ 28, वासीम नाबाद 12, अवांतर 16, बर्गर 4-46, पीटर 3-55, बॉश्च 2-58), द. आफ्रिका 40.1 षटकात 2 बाद 270 (डी कॉक नाबाद 123, प्रेटोरियस 46, झोर्झी 76, ब्रिझेकी नाबाद 17, अवांतर 8, मोहम्मद वासीम व अशरफ प्रत्येकी 1 बळी).