For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवस रंगोत्सवाचा...ताण परीक्षांचा

11:05 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिवस रंगोत्सवाचा   ताण परीक्षांचा
Advertisement

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई :  दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जल्लोष कमी

Advertisement

बेळगाव : गल्लोगल्ली उभारलेले स्प्रिंकलर्स, त्यातून फवारले जाणारे पाणी आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई अशा वातावरणात शहर परिसरात रंगोत्सव अर्थात धूळवड साजरी झाली. तरुणाईने अत्यंत उत्साहाने रंगोत्सव साजरा केला तरी दहावी व पाचवी, आठवी, नववीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा रंगोत्सवातील सहभाग अल्पसा ठरला. त्यामुळे नेहमीप्रमाणे रंगोत्सव साजरा झाला. मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जल्लोष काहीसा कमीच दिसून आला. परिणामी दिवस रंगोत्सवाचा...ताण परीक्षांचा असेच चित्र पहायला मिळाले. शहर परिसरात शनिवारपासूनच रंगोत्सवाची तयारी सुरू होती. बाजारपेठेमध्ये रंग, पिचकाऱ्या, वेगवेगळे मुखवटे, रंगीबेरंगी केसांच्या टोप्या दाखल झाल्याने त्याची खरेदी सुरू झाली. रविवारी रात्री होळी पेटली आणि रंगोत्सवाला प्रारंभ झाला. वर्दीच्या रिक्षामामांनी आपल्या रिक्षातील मुलांसमवेत आठवडाभरापूर्वीच रंगोत्सव साजरा केला होता. तेव्हाच तरुणाईने आणि विद्यार्थ्यांनी रंग खरेदी करून ठेवले होते. रविवारी रात्री सर्वत्र टिमक्या वाजवत हौशी तरुणाईने रंगोत्सवाला सुरुवात केली. परंतु, खऱ्या अर्थाने सोमवारी या उत्सवाला उधाण आले.

शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य

Advertisement

शहरात सकाळपासूनच परस्परांना रंग लावण्यात येत होते. मात्र, दहावीची व अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. याशिवाय रंगाचा बेरंग केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांनी दिला होता. रंगोत्सव खेळणाऱ्या तरुणाईने शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परीक्षेला जाऊ देऊन सहकार्य केले. शाळांच्या समोर आपल्या मुलांना सोडण्यासाठी व नेण्यासाठी आलेल्या पालकांनासुद्धा रंग खेळणाऱ्यांनी रंग न लावता संयम बाळगला. अर्थात काही हौशी तरुणाईने पालकांच्या परवानगीने माफक रंग लावला.

पाण्याच्या स्प्रिंकलर्सची उभारणी

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ, चव्हाट गल्ली, खडक गल्ली, भांदूर गल्ली, गणाचारी गल्ली, पांगुळ गल्ली यासह चन्नम्मानगर, टिळकवाडी, अनगोळ, कॅम्प, क्लब रोड, नेहरूनगर, हनुमाननगर, बॉक्साईट रोड अशा सर्व ठिकाणी रंगोत्सव साजरा झाला. परीक्षा नसलेल्या विद्यार्थ्यांनी उत्सवाचा आनंद लुटला. चव्हाट गल्ली, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, शुक्रवार पेठ येथे पाण्याचे स्प्रिंकलर्स लावण्यात आले होते. ते उभारलेल्या जागेमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. तर बघ्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले.

गवळी गल्लीमध्ये रंग खेळण्यामध्ये महिलावर्ग आघाडीवर

गवळी गल्लीमध्ये रंग खेळण्यामध्ये महिलावर्ग आघाडीवर होता. येथेही पाण्याचा वापर झाला आणि परस्परांना रंग लावून रंगोत्सव खेळण्यात महिला गर्क झाल्या होत्या. परीक्षांमुळे यंदा रंगोत्सव खेळणाऱ्यांची संख्या घटली असली तरी दुचाकीवरून सर्वत्र फिरणाऱ्या तरुणाईची संख्या अधिक होती. कॉलनीमध्ये, अपार्टमेंटमध्ये, विविध आश्रमांमध्ये रंगोत्सव खेळला गेला. समाजमाध्यमांवर होळीच्या आणि रंगोत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होती. तसेच ठिकठिकाणी सेल्फी काढून अपलोड करण्यात येत होती.

कोंबड्याच्या आकाराच्या टोप्या विशेष चर्चेत

बऱ्याच ठिकाणी लाल, सोनेरी, पिवळा व काळ्या रंगाच्या केसांच्या टोप्या घालून खेळणाऱ्या तरुणाईने लक्ष वेधून घेतले. शिवाय कोंबड्याच्या आकाराच्या टोप्या विशेष चर्चेत राहिल्या. संपूर्ण शरीराला वॉर्निश लावून फिरणारे तरुणही दिसत होते. होळी व धूळवड म्हटले की, अलीकडे कपडे फाडण्याचे एक फॅड नव्याने सुरू झाले आहे. तरुणांनी यंदाही त्यामध्ये खंड ठेवला नाही. परंतु, त्यांचे अनुकरण करत बालचमूनेसुद्धा परस्परांचे शर्ट फाडण्यामध्ये धन्यता मानली.

बाजारपेठेत शुकशुकाटच

दुपारनंतर धूळवड काहीशी शांत झाली. तरी 4 नंतरही बाजारपेठेत तसा शुकशुकाटच होता. तुरळक प्रमाणात दूध विक्री केंद्र आणि औषध दुकाने सुरू होती. मात्र, हातावर पोट असणाऱ्या भाजीविक्रेत्या महिला मात्र बाजारपेठेत दाखल झाल्या.

Advertisement
Tags :

.