Satara Diwali News : दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी...
वसुबारसने आज दिवाळीस प्रारंभ
कराड : 'दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी...' म्हणत आज वसुबारसने दिवाळीची सुरुवात होत आहे. वसुबारसला गाय-वासराच्या पुजेला महत्व असते. ग्रामिण भागाबरोबरच शहरातही महिलांकडून मनोभावे गाय-वासराची पूजा करण्यात येते.
आज दिवाळीचा पहिला दिवस असल्याने घरोघरी पहिला दिवा लागणार असून दारात आकाश कंदील लावण्यात येणार आहे. दिवाळी सणास आज वसुबारसने प्रारंभ होत आहे. ग्रामिण भागात सहजरित्या गाय-वासरू पुजेसाठी उपलब्ध होते.
मात्र शहरातील महिलांनाही गाय-वासराचे पुजन करता यावे यासाठी हिंदू एकता आंदोलन व विक्रम पावसकर मित्र परिवाराच्या वतीने गाय-वासराच्या १४ जोड्या उपलब्ध केल्या आहेत. शुक्रवारी दुपारी चार नंतर शुक्रवार पेठ, सोमवार पेठ व वाखाण परिसरात गाय-वासरू पुजनासाठी उपलब्ध होणार आहेत.
वसुबारसच्या निमित्ताने आज घरोघरी पहिला दिवस लागत असून दिवाळीस सुरवात होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, आदी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.