डेव्हिड वॉर्नरचा दीडशतकी तडाखा
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, पहिली कसोटी : कांगारुंच्या पहिल्या दिवसअखेरीस 84 षटकांत 5 बाद 346 धावा : उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेडची शानदार खेळी : आमेर जमालचे 2 बळी
वृत्तसंस्था /पर्थ
येथे पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी डावखुर फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने 84 षटकांत 5 बाद 346 धावा केल्या. वॉर्नरने तुफानी फलंदाजी करताना पाक गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दिवसअखेरीस मिचेल मार्श 15 तर अॅलेक्स केरी 14 धावांवर खेळत होते. प्रारंभी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना सलामीवीर वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी 126 धावांची भागीदारी केली. ख्वाजाने 98 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली. त्याला शाहीन आफ्रिदीने यष्टिरक्षक सर्फराज अहमदच्या हाती झेलबाद केले. याचवेळी दुसरी विकेट मार्नस लाबुशेनच्या रुपाने पडली. तो 25 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.
वॉर्नरचे शतक अन् विक्रमाला गवसणी
सलामीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर वॉर्नरने मात्र पाक गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्याने कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक झळकावताना 211 चेंडूत 16 चौकार व 4 षटकारासह 164 धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने स्टीव्ह स्मिथ (31), ट्रेव्हिस हेड (40) यांना सोबत घेत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. या शतकी खेळीदरम्यान, वॉर्नरने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. वॉर्नरने शतक झळकावताच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकच्या शतकांचा विक्रम मोडित काढला. त्याने 120 कसोटी सामन्यात 25 शतके झळकावली होती. आता वॉर्नरने 110 कसोटी सामन्यात 26 शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतक वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 49 वे शतक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडच्या एक पाऊल पुढे गेला आहे. द्रविडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतकांची नोंद आहे.
दरम्यान, दीडशतक झाल्यानंतर वॉर्नरला 164 धावांवर आमेर जमालने बाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली. वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्श व अॅलेक्स केरी यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 5 गडी बाद 346 धावा केल्या आहेत. मार्श 15 तर केरी 14 धावांवर खेळत होते. पाकिस्तानकडून अमेर जमालने 2, फहीम अश्रफने 1, शाहीन अफ्रिदीने 1 आणि खुर्रम शहजादने 1 गडी बाद केला. तर सलमान आघा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. 70 धावा देत एकही गडी बाद करता आला नाही.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव 84 षटकांत 5 बाद 346 (डेव्हिड वॉर्नर 164, उस्मान ख्वाजा 41, स्टीव्ह स्मिथ 31, ट्रेव्हिस हेड 40, मार्श नाबाद 15, केरी नाबाद 14, जमाल 63 धावांत 2 बळी).
वॉर्नरची शेवटची कसोटी मालिका
डेविड वॉर्नर त्याच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना तो त्याच्या घरच्या मैदानात म्हणजेच सिडनीत खेळेल. यानंतर तो कसोटी क्रिकेटला रामराम ठोकेल. वॉर्नरने ही कसोटी मालिका त्याच्या कसोटी कारकीर्दीतील अखेरची मालिका असल्याचे आधीच घोषित केले होते. दरम्यान, पहिल्याच कसोटीत त्याने धमाकेदार खेळी करतान दीडशतकी खेळी साकारली. माझे काम ऑस्ट्रेलियासाठी धावा करणे आहे. संघासाठी शतक झळकावल्याचा मला आनंद आहे. पहिल्या डावात आम्हाला मोठी धावसंख्या करायची आहे, जेणेकरून आमच्या गोलंदाजांना चांगल्या संधी मिळतील, असे वॉर्नर सामन्यानंतर म्हणाला.
शतकानंतर जोरदार सेलिब्रेशन, टीकाकारांना दिले चोख उत्तर
पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर वॉर्नरने जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी त्याने ओठांवर बोट ठेवून ‘शांत‘ राहण्याचा इशारा केला. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने वॉर्नरबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरला शानदार निरोप देण्याची तयारी करत आहे. ज्यावर मिशेल जॉन्सनने आक्षेप घेतला होता. पण, वॉर्नरने मात्र दमदार खेळी साकारत टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे. वॉर्नरने शतकी खेळीनंतर हवेत उडी घेत किस केलं. चाहते हा व्हिडीओ पोस्ट करत आहेत. येथे येणं आणि धावा करणं माझं काम आहे. शतकी खेळी करणं एक चांगली अनुभूती आहे. विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही, असे तो यावेळी म्हणाला.