कन्येचा अंत्यसंस्कार...मातेचा श्रृंगार
कोणाचाही मृत्यू ही अतिशय दु:खद घटना आहे. विशेषत: ज्या घरात अशी दुर्घटना झालेली असते, त्या घरातील माणसांवर तर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो. विशेषत: हा मृत्यू जर पुत्राचा किंवा कन्येचा, म्हणजेच तरुण व्यक्तीचा झालेला असेल तर, त्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या किंवा मृताच्या मातापित्यांच्या दु:खाला पारावार असत नाही. हा धक्का ते आयुष्यभर विसरु शकत नाहीत.
मातेला आपल्या अपत्यांपेक्षा अधिक प्रिय कोणीही नसते, असेच मानले जाते. माता एकवेळा तिच्यावर कोणतेही मोठे संकट ओढवले तरी सहन करु शकेल पण आपल्या आपत्यांना साधे खरचटलेलेही तिला सहन होत नाही. अशा मातेवर जर आपल्या पुत्राचा किंवा कन्येचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ आलीच तर तिच्यावर केवढा आघात होईल, याची आपण कल्पनाही करु शकत नाही.
तथापि, कैरीसा नामक एक माता याला अपवाद आहे. सध्या या मातेचा एक व्हिडीओ गाजत आहे. ही माता कोणत्या देशातील आहे, हे समजू शकत नाही. तथापि, तिच्या छोट्या कन्येचा मृत्यू झाल्यानंतर ती या कन्येच्या अंत्यसंस्कारासाठी नटून थटून तयार होत असलेली या व्हिडीओत दिसून येते. हा व्हिडीओ तिने स्वत:च टाकलेला आहे. माझ्या कन्येच्या अंत्यसंस्कारासाठी मी साजश्रृंगार करत आहे, असा संदेशही तिने या व्हिडीओतून प्रसिद्ध केल्याचे दिसून येते.
हा व्हिडीओ असंख्य लोकांनी पाहिलेला आहे. तथापि, बहुतेकांनी या मातेला ट्रोल केलेले आहे. अनेकांनी तिला निर्दयी आणि भावनाशून्य ठरविले आहे. तिची निर्भर्त्सना केली आहे. तर अनेकांनी तिच्यावर ‘माता कशी नसावी, याचे उदाहरण’ अशी टिप्पणीही केल्याचे दिसून येते. काही जणांनी ती हे प्रसिद्धीसाठी करत असून हा आपल्या कन्येच्या मृत्यूचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी केलेला एक स्टंट आहे, अशा शब्दांमध्ये तिला सुनावले आहे. या घटनेतील सर्वात महत्वाचा भाग असा की कैरिस नामक या मातेची कन्या तिचा जन्म झाल्यानंतर दोनच दिवसांनी मृत्यू पावली होती. मात्र तिच्या मातेवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कन्येच्या अंत्यसंस्कारासाठी इतका साजश्रृंगार करण्यामागे या मातेची भूमिका कोणती आहे, तसेच तिच्या कुटुंबियांचे यावर मत काय आहे, हे अद्याप समजलेले नाही. पण असे केल्याने ती असंख्य लोकांच्या संतापाचे कारण बनली असून तिने हा राग स्वत:च्या कृतीने ओढवून घेतला आहे, हे निश्चित दिसून येते.