For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सुकन्या समृद्धी योजने’मुळे मुलगी झाली समृद्ध

11:23 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘सुकन्या समृद्धी योजने’मुळे मुलगी झाली समृद्ध
Advertisement

बेळगाव पोस्ट विभागात यावर्षी 4777 मुलींची नोंद : 15 वर्षे खात्यामध्ये पैसे भरणे आवश्यक

Advertisement

बेळगाव : मुलींच्या भवितव्यासाठी तसेच पालकांना अल्प बचतीतून शिक्षण, लग्नाचा खर्च करता यावा यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू करण्यात आली होती. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही मोठ्या प्रमाणात सुकन्या समृद्धी योजनेकडे नागरिकांचा कल आहे. बेळगाव जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात एकूण 4777 मुलींची सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती बेळगाव पोस्ट विभागाने दिली. ‘बेटी पढाओ, बेटी बढाओ’ या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली. पालकांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येक महिन्याला अथवा वर्षांतून एकदा बचत करून गुंतवलेल्या रकमेवर केंद्र सरकारकडून चांगला व्याजदर दिला जातो. मुलीच्या वयाच्या 21 वर्षांनंतर या योजनेचा लाभ मिळतो. केंद्र सरकारकडून चांगला व्याजदर दिला जात असल्याने दरवर्षी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

बेळगाव पोस्ट विभागामधील बेळगाव, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल व कित्तूर तालुक्यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेची नोंदणी करून घेतली जाते. प्रत्येक पोस्ट कार्यालयात नोंदणी करता येते. आर्थिक वर्ष 2023-24 पेक्षा यावर्षी म्हणजेच 2024-25 या आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेतील नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी बेळगाव पोस्ट विभागामध्ये 4777 मुलींची नोंद करण्यात आली आहे. मुलींचे शिक्षण व लग्नाच्या खर्चाचा बोजा पालकांवर एकाचवेळी पडू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. 2015 पासून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मुलीच्या जन्मापासून दहाव्या वर्षांपर्यंत सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडले जाऊ शकते. या योजनेसाठी 250 रुपये भरून खाते उघडता येते. त्यानंतर वर्षांकाठी दीड लाखापर्यंतची रक्कम खात्यात जमा करता येते. खाते उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे कधीही न चुकता खात्यामध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. मुलीच्या 21 व्या वर्षांनंतर योजनेची मुदत संपेल व त्यानंतर मुलीला पैसे मिळतील.

Advertisement

खाते कोठे उघडावे...

जवळच्या कोणत्याही पोस्टमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेसाठी नोंदणी केली जाऊ शकते. मुलीचे आधारकार्ड, जन्मदाखला तसेच आई-वडिलांची कागदपत्रे जोडल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडले जाते. ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयापासून शहरी भागातील मुख्य पोस्ट कार्यालयापर्यंत सर्व ठिकाणी हे खाते उघडले जाते. अंगणवाडीच्या माध्यमातून यासाठी नवीन जन्मलेल्या मुलींच्या कुटुंबीयांना माहितीदेखील देण्यात येते.

केंद्र सरकारकडून सर्वाधिक व्याजदर

केंद्र सरकारकडून अनेक बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु यामध्ये सर्वांधिक व्याजदर सुकन्या समृद्धी योजनेला आजवर देण्यात आला आहे. दरवर्षी रिझर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार व्याजदरामध्ये बदल होत असतो. मागील काही वर्षांत 8 टक्के असलेला व्याजदर आता काहींसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच आयकर कायद्याच्या 80-सी अंतर्गत गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आली आहे.

मुलींचे शिक्षण, लग्न, इतर खर्चांसाठी ही महत्त्वाची योजना 

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी अतिशय महत्त्वाची ठरत आहे. मुलींचे शिक्षण, लग्न यासह इतर खर्चांसाठी ही महत्त्वाची बचत ठरते. बेळगाव पोस्ट विभागात मागील वर्षाच्या तुलनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

-मृणाल, साहाय्यक पोस्ट अधीक्षक, बेळगाव

Advertisement
Tags :

.